वाढदिवसाची पार्टी करून बर्थडे बॉयला रॉडने मारहाण

0
373

दिघी, दि. ११ (पीसीबी) – बर्थडे बॉयने मित्रांना वाढदिवसाची पार्टी दिली. पार्टीत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून मित्रांनी काही दिवसांनी बर्थडे बॉयला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी पाच वाजता साई पार्क रोड, दिघी येथे घडली.

जय संजय मोहिते (वय 20, रा. एकता कॉलनी, भोसरी) असे जखमी बर्थडे बॉयचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज पेटकर (रा. दिघी), सोन्या वैरागी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जुलै रोजी फिर्यादी जय यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी 3 जुलै रोजी मित्रांना दुपारी पार्टी दिली. ही पार्टी दिघी येथील एका मोकळ्या मैदानात झाली. पार्टीच्या वेळी जय यांचा मित्र शेखर चौधरी याने दारूची बाटली फोडली. त्याची काच जय यांच्या तोंडावर लागली. त्यावेळी जय यांनी जमिनीवर दगड मारला. त्यावरून जय यांचा मित्र आरोपी राज याने जय यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या भांडणाचा राग राजच्या मनात होता.

9 जुलै रोजी दुपारी पाच वाजता जय आणि त्यांचा मित्र गुड्या असे दोघेजण राज याचा मित्र मयूर याच्याकडे असलेले उसने पैसे परत मागण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी जय यांना लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर मारून जखमी केले. सोन्या याने लाथाबुक्क्याने मारहाण केली. रॉडचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.