हडपसर, दि. ११ (पीसीबी) : पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावं वगळण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून फुरसुंगी आणि उरळी देवाची या नवीन नगरपरिषद असतील असं जाहीर केलं आहे. याचवेळी पुणे महानगरपालिकेची वाढलेली व्याप्ती आणि त्यामुळे सुविधांवर येत असलेला ताण यामुळे पूर्व पुण्याची स्वतंत्र महापालिका व्हावी अशी मागणी गेली काही वर्षांपासून होत आहे. दरम्यान, वाघोली- हडपसर अशी स्वतंत्र महापालिका निर्माण कऱण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाल सुरू आहे.
पुणे महानगरपालिकेची वाढलेली व्याप्ती आणि त्यामुळे सुविधांवर येत असलेला ताण यामुळे पूर्व पुण्याची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी गेली काही वर्षांपासून होत आहे. सरकारने पालिका प्रशासनाकडे अशी महापालिका निर्माण करण्याच्या दृष्टीने अहवाल मागवला आहे. त्यादृष्टीने हडपसर येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत परिसरातील धुरिणांमध्ये मतभेद दिसून आले.हडपसरसह पूर्व भागाची नविन महानगरपालिका स्थापन करण्यात यावी, या बाबींवर चर्चा करण्यासाठी हडपसर भाजी पाला खरेदी-विक्री सोसायटीत परिसरातील सर्वपक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत उपस्थित दोन माजी महापौरांसह काही पदाधिकाऱ्यांनी नवीन महानगरपालिकेला विरोध दर्शविला आहे तर, दोन माजी आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनी नवीन पालिका स्थापनेच्या बाजूने मत प्रदर्शित केले. हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सह. सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी पूर्व पुण्याची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी गेली दहा वर्षांपासून लावून धरली आहे. सरकारच्या नव्या पालिकेच्या सकारात्मक भूमिकेमुळे त्यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती.