वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा ,संभाजीराजे यांचा शिवसेनेला टोला..

0
329

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) : राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला. कोल्हापुरातील संजय पवार हे या निवडणुकीत पराभूत झालेत. या जागेसाठी संभाजीराजे इच्छुक होते. मात्र, शिवसेनेने उमेदार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शिवसेनेच्या पराभवानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला मारलाय. जगदगुरू संत तुकोबारायांचा एक अभंग त्यांनी ट्वीट केलाय. खोटा आव आणणाऱ्यांची फजिती होते, अशा अर्थाचं ट्वीट संभाजीराजे यांनी केले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ, असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली. मात्र, ही अट धुडकावून लावली. त्यांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्विट करत संभाजीराजे याेनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत..
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
म्हणजेच, वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. 42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे आहे.