वाकड येथे पोलिसांनी पकडला २४ किलो गांजा

0
459

वाकड, दि. ९ (पीसीबी) – वाकड मधील सम्राट चौकात कारवाई करून वाकड पोलिसांनी २४ किलो गांजा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

श्रीकांत लिंबाजी राठोड (वय ३३, रा. बालेवाडी. मूळ रा. सोलापूर), सुनील लालसिंग राठोड (वय ३१, रा. सोलापूर), तानाजी दगडू पवार (वय ४२, रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार वंदू दत्तात्रय जिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील सम्राट चौकात रस्त्याच्या बाजूला काहीजण गांजा विकण्यासाठी आले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४ किलो १०५ ग्रॅम वजनाचा तीन लाख ३६ हजार रुपयांचा गांजा, ३० हजारांचे तीन मोबाईल, तीन लाखांची एक कार असा सहा लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.