खासदार श्रीरंग बारणे यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
पिंपरी, दि . १६ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या वाकड, पुनावळे, ताथवडे भागात नागरी सुविधांची कमतरता आहे. या भागात बांधकाम परवानग्या दिल्या जातात. पण, सुविधा दिल्या जात नाहीत. या भागातील पाणी, कचरा, लाईट, रस्त्यांच्या समस्या आठ दिवसात निकाली काढण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
वाकड, पुनावळे, ताथवडे या प्रभागातील नागरिकांकडून रस्ते, लाईट, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेविषयी सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यापार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी मंगळवारी “ड” प्रभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता विद्युत सचिन नांगरे, मुख्य आरोग्य अधिकारी योगेश फस्ते, सहायक आरोग्य अधिकारी एस.ए. माने, उपअभियंता (स्थापत्य) रविंद्र सूर्यवंशी आणि आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे उपस्थित होते. तसेच पुनावळेतील सेव्हन प्ल्यू मेरिया ड्राईव्ह सोसायटी, कल्पतरु एक्वीसीटसह परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, वाकड, पुनावळे, ताथवडे हा भाग वेगाने विकसित होत आहे. या भागात गगनचुंबी इमारती उभारत आहेत. मोठ-मोठ्या सोसायट्या होत आहेत. लोकसंख्येत वाढ होत आहे. महापालिकेकडून बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा आहे. मात्र, त्याप्रमाणात सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. बांधकाम परवानगीबरोबरच सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. रस्त्यांच्या कामाला गती द्यावी. कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर कचरा टाकला जातो. कचऱ्याची समस्या मार्गी लावावी. रस्त्यावरील राडारोडा उचलावा, रस्त्यांची नियमितपणे साफसफाई करावी. लाईटचे पोल उभे आहेत. पण, लाईट नाही. याबाबत महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा जोडणी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सेव्हन प्ल्यू मेरिया ड्राईव्ह सोसायटीत नऊ इमारती आहेत. सोसायटीच्या परिसरात असलेल्या भुयारी मार्गात पाणी साचते. त्यावर उपाययोजना कराव्यात. रस्त्यांच्या कामाला गती द्यावी. आठ दिवसात या नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत.