वाकड परिसरातील रस्ते आठ दिवसांत दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन – विशाल वाकडकर

0
47

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) वाकड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या वाकड आणि परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच प्रमुख रस्ते उखडले गेले असून नागरिक वाहनचालक यांना त्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. पुढील आठ दिवसांत रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते विशाल वाकडकर यांनी दिला आहे.

याबाबत विशाल वाकडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वाकड आणि परिसरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, यामध्ये भूमकर चौक ते हिंजवडी हा प्रमुख रस्ता यावर भूमकर चौक येथे मोठ्या प्रमाणत खड्डे पडले आहेत. कस्तुरी चौक ते विनोदे नगर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, काही ठिकाणी चेंबर चे झाकणही नाहीत. तसेच विनोदे नगर येथील प्रमुख रस्ता अवघ्या दीड महिन्यात उखडला आहे. तसेच आल्हाट वस्ती कडे जाणारा इन्सिग्निया सोसायटी जवळील रस्ता अत्यंत दुरवस्थेत आहे सर्वत्र खड्डे आणि चिखल तुडवत नागरिकांना जावे लागत आहे.

    वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथ गतीने चालू असून ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे काम चालू आहे. याचा सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक व्यावसायिक विक्रेते यांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

त्याचबरोबर भुजबळ चौक वाकड येथील हॉटेल राजयोग समोरील सर्व्हिस रस्ता हा पूर्णतः खड्डेमय झाला आहे. सर्वत्र खड्डे पडले असून काही ठिकाणी चेंबर चे झाकण ही नाहीत उघडे चेंबर अपघातास निमंत्रण ठरत आहेत तरीही अशा परिस्थितीतून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि वाढती वाहतूककोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उद्योग नगरी असा बिरूद मिरवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना उत्तम प्रतीचे रस्तेही देऊ शकत नाही याबाबत नागरिकांमधून चीड व्यक्त केली जात आहे.

  आयटी नगरी हिंजवडी कडे जाणारे प्रमुख मार्ग असणारे भूमकर चौक आणि भुजबळ चौक येथे सकाळी आणि सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि वाहतूकोंडीमुळे हिंजवडी आयटी नगरीतील चाळीस कंपन्यांनी नुकतेच स्थलांतर केले आहे. याचे महानगरपालिका आणि प्रशासनाला कसलेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.
     पूनावळे, ताथवडे येथील भुयारी मार्गात खड्डे पडले असून त्यात सातत्याने पाणी साचते आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही याबाबत ठोस पावले न उचलता प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.  सद्या पिंपरी चिंचवड मनपाची कामे फक्त कागदोपत्री होत असून ठेकेदारांचे खिशे भरण्याचे काम सुरू आहे असेही विशाल वाकडकर यांनी म्हटले आहे.