वाकड दत्त मंदिर रस्ता रुंदिकरणातील अतिक्रमणांवर कारवाई

0
20

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) – वाकड परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांनी एक होत जनमताचा रेटा निर्माण केल्याने दत्त मंदिर ४५ मीटर रस्ता रुंदिकरणाला अडथळा ठरणारी रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व अतिक्रमणे पाडायचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. आमदार शंकर जगताप यांनी दोनच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे आयोजित बैठकित प्रलंबित कामांचा आढावा घेतला होता. अतिक्रमणांचा विषयसुध्दा त्या चर्चेत होता.
दत्त मंदिर रस्ता विकास आराखड्यात ४५ मीटर रुंद असताना तो अनेक ठिकाणी २० ते ३० मीटर रुंद होता. रस्त्याच्या दुतरफ्या एका झोपडपट्टीचे अतिक्रमण थेट रस्त्यात असल्याने तिथे रस्ता एकदम चिंचोळा होता. हिंजवडीच्या दिशेने जाणारी बहुसंख्य वाहने याच रस्त्याने ये-जा करत असल्याने रोज वाहतूक कोंडी होत असते. रुंदिकरणात येणाऱ्या काही हाऊसिंह सोसायट्यांच्या साईड मार्जीनमध्ये माजी नगरसेवकांनी बेकायदा दुकाने काढून भाड्याने दिली होती. जिथे फूटपाथ आहे तिथे टपऱ्या, पत्रा शेडचे अतिक्रमण होते. काही जागा मालक जागा ताब्यात देत नसल्याने प्रशासनाची कुचंबना होत होती. परिणामी या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. गेली पाच-सहा वर्षांपासून या विषयावर सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी एकत्र येत आवाज टाकला. आमदार शंकर जगताप यांनी त्यात विशेष लक्ष घातले. महापालिका आयुक्त सिंह यांच्याकडे त्यासाठी विशेष बैठकित हा विषय छेडला होता. त्यानंतर तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोलपे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई कऱण्यात आली.

सुमारे ६० वर पोलिस अधिकारी- कर्माचारी, महापालिकेचे २०० कर्माचारी तसेच पोकलेन, जेसीबी असा मोठा ताफा या कारवाईत होता. पत्राशेड आणि पक्क्या इमारती मिळून एकूण शंभरवर अतिक्रमणे आहेत. आजच्या कारवाईत ४० पत्राशेड, दोन पक्क्या इमारती पाडण्यात आल्या. गेले आठवडाभर या जागा मालकांना गेली सहा महिन्यांपासून नोटीस दिली, तसेच स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची सुचना दिली होती.