वाकड ते मामुर्डी क्रॉसिंग होणार सुकर – शंकर जगताप

0
22

सुसज्ज सेवा रस्त्यांसह आता वाकड ते मामुर्डी परिसरात नवीन सात ठिकाणी “बॉक्स स्ट्रक्चर” – शंकर जगताप

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेत मांडले पर्यायी वाहतुकीचे मार्ग

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सयाजी, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन व मामुर्डी या सात ठिकाणी “बॉक्स स्ट्रक्चर”चा पर्याय

पिंपरी 14: वाकड ते मामुर्डी भागात वाढलेली रहदारी लक्षात घेऊन या भागातील सेवा रस्ते अतिक्रमण मुक्त करून डांबरीकरण करण्यात आले. या परिसरात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, अंडरपासचे काम पूर्णत्वाला जात असताना आता नवीन सात ठिकाणी “बॉक्स स्ट्रक्चर”च्या माध्यमातून महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील वाहतूक क्रॉसिंग सुकर करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेत सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन व मामुर्डी या ठिकाणी तातडीने नवीन अंडरपास बांधण्यात यावेत. यातून वाकड ते मामुर्डी हा भाग वाहतूक कोंडी मुक्त होऊन येथून ये- जा करताना क्रॉसिंग सुकर होईल आणि शहरवासीयांना दिलासा मिळेल असे देखील जगताप यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून यादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी रविवारी (दि 14)
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड शहरातील सध्याच्या वाहतूक कोंडी संदर्भात जगताप यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (पुणे पश्चिम बायपास ) परिसरातील वाकड ते मामुर्डी या भागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि औद्योगिक विकास झाला आहे. आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहती, निवासी व व्यापारी टाउनशिपमुळे या महामार्गावरील वाहतुकीचा भार प्रचंड वाढला आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची अपुरी क्षमता व ग्रेड सेपरेशन अभावी स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक एकमेकांत मिसळून मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन गडकरी यांना दिले आहे.

या निवेदनामध्ये जगताप यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 परिसरातील पुनावळे, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, किवळे व रावेत परिसरात दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वारंवार अपघात होत आहेत. याचा थेट परिणाम उद्योग, व्यापार आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होत आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ वाढल्याने आर्थिक नुकसानही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे अंडरपास, पुनावळे अंडरपास, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन व मामुर्डी अंडरपास येथे अतिरिक्त “बॉक्स स्ट्रक्चर” उभारल्यास वाहतूक सुरळीत होईल, येथून ये जा करताना बिना अडथळा क्रॉसिंग सुकर होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल तसेच स्थानिक नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.

…….

एकीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 परिसरामध्ये वाकड ते मामुर्डी या भागातील सेवा रस्त्यांना अतिक्रमण मुक्त करतानाच डांबरीकरण पूर्ण करण्यात आले तर दुसरीकडे पुनावळे, ताथवडे आणि वाकड अंडरपास येथे “बॉक्स पुशअप” बसवण्यासंदर्भात काम प्रगती पथावर असतानाच नव्या सात अंडरपास मुळे या भागातील वाहतुकीच्या संदर्भात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा महामार्ग आयटी हब, शैक्षणिक संकुले, औद्योगिक पट्टा, टाउनशिप, रुग्णालये, पेट्रोलियम उद्योग, निवासी व व्यापारी क्षेत्र तसेच ऑटोमोबाईल उद्योग यांमधून जात असून, मालवाहतुकीसाठी मोठी क्षमता असणारा आहे. पुणे शहरात वाहतूक ही दीर्घकाळापासून गंभीर समस्या असून, गेल्या काही वर्षांत ती अधिकच तीव्र झाली आहे. हा मार्ग पुनावळे, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, किवळे व रावेत या गर्दीच्या भागांतून जातो व अनेक प्रमुख चौकांना छेदतो. त्यामुळे या भागांमध्ये अतिरिक्त वाहतूक पर्यायांची उभारणी करणे गरजेचे आहे त्यासाठी बॉक्स स्ट्रक्चर किंवा अंडरपास करणे जरुरी आहे त्यासाठी या परिसरातील सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन व मामुर्डी ही
सात नवीन ठिकाने आमदार शंकर जगताप यांच्याकडून सुचविण्यात आलेली आहेत.
………..

प्रतिक्रिया

वाकड ते मामुर्डी या भागाचा वाढलेला प्रचंड “स्कोप” पाहता आपल्याला येथील वाहतुकीला दीर्घकालीन पर्याय शोधणे गरजेचे आहे. या भागातील सेवा रस्त्यांना प्राधान्या देत त्यांचे अतिक्रमण मुक्त करणे तेथे डांबरीकरण करणे हे काम अग्रक्रमाने करण्यात आले. हा भाग पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडतो. या भागात वाढलेल्या औद्योगिक आणि शैक्षणिक संधी पाहता या भागामध्ये चांगल्या रस्ते सुविधा देणे क्रमप्राप्त आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना या संदर्भात अवगत केले. या परिसरासाठी आता सात नवीन ठिकाणी “बॉक्स स्ट्रक्चर”च्या माध्यमातून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातून या भागातील क्रॉसिंग सुकर होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शंकर जगताप
आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर.