वाकड टीडीआर घोटाळ्या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार – रोहित पवार

0
153

संभाजी ब्रिगेडच्या उपोषणाला रोहित पवारांचा पाठिंबा

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी महापालिकेसमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची आमदार रोहित पवारांनी भेट आज रोजी भेट घेतली. यावेळी वाकडमधील टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण येत्या काळात विधानसभेत मांडणार असे आश्वासन दिले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे हे करीत असलेल्या आंदोलनाची माहिती घेतली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासकाला विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आली,यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केला होता.कथित टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी), पोलीस महासंचालक,पुणे अँटी करप्शन ब्युरो तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.तसेच या संदर्भात महापालिकेसमोर ‘धरणे आंदोलन’,आयुक्तांना साखळी उपोषण दिसावे म्हणून ‘चष्मा भेट दो आंदोलन’ तसेच गेल्या सोळा दिवसांपासून ‘बेमुदत साखळी उपोषण’ करण्यात येत आहे.

दरम्यान,आमदार रोहित पवारांनी बेमुदत साखळी उपोषणास बसलेले संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव,उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण,रावसाहेब गंगाधरे, अनिल गाडे,संतोष शिंदे,वसंत पाटील या उपोषणकर्त्यांची भेट घेतली.रोहित पवारांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या तक्रारी, आंदोलने यांची माहिती घेतली. यावेळी रोहित पवार म्हणाले की, वाकडमधील टीडीआर घोटाळा म्हणजे प्रशासन काळात महापालिकेत महाघोटाळा करण्यात आला.जर घोटाळा झाला नसेल तर टीडीआर प्रकरणाला स्थगिती का देण्यात आली.? मनपा आयुक्त गांधारीची भूमिका पार पाडत आहेत. हा मोठा आर्थिक गैरव्यवहार असून त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता अप्रत्यक्षरीत्या प्रसाद गायकवाड यांनी केलेल्या गैरकारभाराला प्रोत्साहन तसेच संरक्षण दिले जात आहेत. त्यामुळे टीडीआर भ्रष्टाचाराच्या चिखलात अनेक जन रुतलेले आहेत.महापालिका आयुक्त व अनेक अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या घोटाळ्याप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी यासाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यास आयुक्तांना वेळ नाही.त्यामुळे येत्या काळात टीडीआर घोटाळ्याचे गंभीर विधानसभेत मांडून शासनाला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे नगरसेविका सुलक्षणा शिलवंत,देवेंद्र तायडे,विशाल जाधव,आदिनाथ मालपोटे,सागर चिंचवडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.