पिंपरी,दि. १७ – वाकड येथील ओढ्यात अनधिकृत पद्धतीने सांडपाणी सोडले जात असल्याने ओढ्याचे पाणी दूषित होत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, साथीचे आजार आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या गांभीर्याची दखल घेत युवा नेते श्री. विशाल भाऊ वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुचिता पानसरे यांना पत्र देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
श्री. वाकडकर यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, वाकड येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळले जात असल्याने भूमकर वस्ती, वाकडकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबळ वस्ती, सौंदर्या गार्डन दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात ओढ्याचे पाणीप्रदूषण वाढत आहे. परिणामी, स्थानिक पर्यावरण धोक्यात येत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या दूषित पाण्यामुळे मच्छर आणि दुर्गंधी वाढत असून, परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजार पसरण्याचा धोका आहे.
तसेच, ओढ्याच्या स्वच्छतेसाठी नियमित साफसफाई आणि अनधिकृत सांडपाणी सोडण्यास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रशासनाने ओढ्यातील सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा किंवा आवश्यक तेथे सांडपाणी वाहिनी जोडण्याची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.
या पत्राद्वारे वाकड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी आग्रही मागणी श्री. विशाल वाकडकर यांनी केली आहे. ओढ्याची स्वच्छता नियमित न केल्यास येत्या काळात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.