वाकडचे बडे प्रस्थ राम वाकडकर यांचाही भाजपला रामराम

0
326

विधानसभेला किमान १० हजार मतांचे गणित बिघडणार, रोजच्या राजीनामा सत्राने प्रदेशचे नेते गडबडले

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) : पक्षांतर्गत गटबाजी, घराणेशाही, मनमानीमुळे चिंचवड विधानसभा मतदारंसघातील भाजपमधील गळती थांबायचे नाव घेत नाहीये. पक्षातील घराणेशाही, मनमानीला कंटाळून वाकड़चेच वजनदार नेते माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आणि भाजप कायमची सोडचिठ्ठी दिली. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वाकडमधील किमान १० हजार मतांचा सात बारा ज्यांच्याकडे आहे, असे मोठे प्रस्थ असणाऱ्या भाजप नेत्याने पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राजीनामा देणाऱ्या या दुसऱ्या नेत्याचे नाव राम वाकडकर असल्याचे अधिकृत सुत्रांकडून समजले. अशा प्रकारे आणखी १५ माजी नगरसवेक, पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे शेकडो समर्थक भाजपतून अन्य पक्षात प्रवेश कऱण्याच्या तयारीत असल्याने शहर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. रोज एक-एक बडा नेता पक्ष सोडत असल्याने विधानसभा निवडणुकित शहरातील महायुतीच्या तीनही जागांना मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येते.

सोमवारी संदीप कस्पटे यांनी अक्षरशः मनावर दगड ठेऊन भाजप सोडला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात त्यांनी आपली व्यथा मांडली. वाकड परिसरात भाजपचा एकही कार्यकर्ता नसताना गेल्या दहा वर्षांत तिथे पक्ष रुजवला आणि महापालिकेला चार सदस्यांचे पॅनल निवडूण आणले. पक्षाशी कायम एकनिष्ट राहिलो, मात्र नवीन शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कार्यकारणी करताना आपल्या समर्थकांना डावलले. भाजपची सत्ता असतानाही महापालिकेत कधी एक पद मिळालेले नाही. राज्यात सत्ता असतानाही आमच्याकडे
जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे कस्पटे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
कस्पटे यांच्या राजीनाम्याने भाजप चांगलीच हादरली आहे, तोच राम वाकडकर यांनीही राजीनामा पाठविल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. चिंचवड विधानसभेला शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यास १५ माजी नगरसेवकांचा विरोध आहे. अशाही परिस्थितीत जगताप
यांनाच पुन्हा संधी दिली जात असल्याने नाराज मंडळींनी मिळून भाजपला घेरले आहे.

दरम्यान, राम वाकडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मनमोकळेपणाने भाजप सोडत असल्याचे कबूल केले. ते म्हणाले, मी बावनकुळे आणि देवेंद्रजी यांना पत्र दिले आहे. जेव्हा भाजपचा बूथ लावायला कोणी तयार नव्हते आणि उमेदवारीसुध्दा घ्यायला घाबरत होते त्या परिस्थितीत मी काम केले. २०१७ ला वाकडमधून महापालिका निवडणूक लढलो. स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहे. हजार-दोन हजार फ्लॅटच्या माझ्या ५-६ साईट सुरू आहेत. शहरातील सहा एसआरए योजना मी करत आहे. माझ्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३,५०० गाड्या शहरात धावतात. गेली २० वर्षांपासून हा व्यवसाय आहे. आमचे स्वतःचे हॉटेल, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी आहे. असा सर्व व्याप असताना पक्षासाठी दिवसाची रात्र केली.

राम वाकडकर अगदी भरभरून बोलले. चिंचवड भाजपतील एकाधिकारशाही नको नको झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, अहो,आम्ही मूळचे वाकड गावचे पाटील आहोत. २०११ पासून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याबरोबर सातत्याने काम करत आलो. शहरात आठवडे बाजार प्रथम मी सुरू केला. नुकत्याच वाकडला मिनी ऑलिपिक स्पर्धा घेतल्या. तब्बल ६,००० लोकांचा सहभाग होता. शहरातील सर्वात मोठी दहिहंडी घेतली त्याला ३५ हजार लोकांची हजेरी होती. लोकसभा निवडणुकिलाही पक्षाच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम प्रामाणिकपणे केले. चिंचवड पोटनिवडणुकिला अश्विनीताईंना या भागातून लिड द्यायला पुढाकार घेतला. पक्ष वाढीसाठी दहा हजारवर नवमतदार मी नोदवले.इतके सगळे असूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची दखल घ्यावी वाटत नाही, याची खंत वाटते. आज आमचे वाकड हे आयटीचे गेट आहे, पण रस्त्यांच्या समस्येकड कोणीही नेत्याने लक्ष दिलेले नाही. आपण पक्षासाठी इतके सगळे काम अहोरात्र करत आलो, पण साधी प्रदेश नेत्यांची ओळखसुध्दा आमचे शहाराध्यक्ष करून देत नाहीत. पक्षाला सर्व ताकद देऊनही दुर्लक्ष होत असेल तर राजीनामा दिलेला बरा. मी याबाबतचे एक पत्र बावनकुळे यांना दिले आणि देवेंद्रजींना मेसेज टाकला आहे.
आगामी काळात काय करायचे याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला दोनदा बोलावून घेतले. आयटी परिसराच्या समस्या आणि उपाय याबाबत मी सविस्तर बोललो आणि त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. आता पुन्हा मला बोलावले आहे, असेही वाकडकर यांनी पीसीबी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.