वाईन शॉप लायसन्स देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक

0
74

तळेगाव, 07 (पीसीबी) : चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांचे वाईन शॉपचे लायसन्स ट्रान्सफर करून नावावर करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक शंकर रामगुडे, पराग शंकर रामगुडे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची मंत्रालयात ओळख असल्याचे फिर्यादी यांना भासवले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून तिथल्या लोकांनी घेतलेले वाईन शॉपचे लायसन्स ट्रान्सफर करून फिर्यादी महिलेच्या नावावर करून देण्याच्या बहाण्याने महिलेकडून 40 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना लायसन्स न देता त्यांना रक्कम परत करण्यासाठी न वटणारे धनादेश दिले. तसेच सातारा येथील एका सदनिकेची खोटी विसार पावती लिहून दिली. लायसन्ससाठी पैसे घेऊन ते परत न करता तसेच लायसन्स न देता फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.