वसंतदादांच्या कुटुंबीयांना जो त्रास झाला तो आज पवार अनुभवतात – शालिनीताई पाटील

0
506

सांगली, दि. ६ (पीसीबी) – वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना त्यांच्याच पुतण्याने बंडखोरी केल्यानंतर काय होते, याचा पक्का अनुभव आला असेल. त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास झाला, तो स्वतःला कसा होतो, हे श्री. पवार यांना पुतण्याने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर अनुभवायला मिळाला असेल, अशी टीका माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर डॉ. शालिनीताई पाटील Shalinitai Patil यांनी खासदार शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. डॉ. शालिनीताई पाटील म्हणाल्या, राज्यात बंडखोरीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार Sharad Pawar यांनीच केली. वसंतदादांना Vasantdada Patil त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले.

काँग्रेस पक्षाने त्यांना पुढे पदे दिली, पक्ष पाठीशी उभा राहिला. पण काँग्रेस पक्षाशी वेळोवेळी त्यांनी गद्दारीच केली. पण, एक मात्र खरे की ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निशाण यावर हक्क सांगितला नाही, तो अजित पवार यांनी सांगितला, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार आणि वसंतदादांमध्ये कोणतेही नाते नव्हते. पण इथे तर हे चुलते पुतणेच आहेत. ज्याला हाताला धरून राजकारणात मोठं केले, त्या पुतण्याने बंडखोरी केल्यानंतर काय होते याचा पक्का अनुभव आता पवारांना आला असेल. त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास झाला असेल, तो स्वतःला कसा होतो, हे शरद पवार यांना अनुभवायला मिळाल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार यांचा आदर्शच त्यांच्या पुतण्याने घेतला आहे.आजवर ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसले तेच फिरून पवारांसमोर आल्याने, आज खऱ्या अर्थाने कै. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला शांती लाभली आहे. आजवरचे विश्वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवारच हेच जबाबदार असल्याची टीका शालिनीताई पाटील यांनी केली.

शरद पवार देशपातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नेते आहेत. पण अजित पवार आता या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. ते शरद पवारांशी बरोबरी करून मोठी चूक करत आहेत. घोटाळे आणि साखर कारखान्यांच्या खरेदीच्या चौकशांमधून सुटण्यासाठीच त्यांनी काकाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये खूप मोठा फरक आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्वसामान्यांना अपेक्षित असणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचा हिंदुत्व हे मनुवादी आहे. भाजपने आजपर्यंत कोणत्याही सोबत्याचे भलं केलं नाही. त्यातूनच अपात्र होण्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत आहे. त्यांना आमदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसाठीसाठी खाती सोडायला तयार नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते. जी वेळ आज एकनाथ शिंदेंवर भाजपाने आणली आहे. तीच वेळ उद्या अजित पवारांवर सुद्धा आणल्याशिवाय भाजप राहणार नाही. राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. सगळे राजकारण मंत्रिपदाच्या स्वार्थासाठी सुरू आहे, असेही त्यांनी नमुद केलं.