राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारात अपघात झाला. आगारात एका बसमधील ऑईल चेक करत असताना दुसऱ्या बसमधील वाहकाने बस सुरु करून पुढे घेतली. त्यात दोन्ही बसची धडक बसली. यामध्ये ऑईल चेक करत असलेल्या महिला सहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजता घडली.
शिल्पा कैलास गेडाम (वय 38, रा. दापोडी, मूळ रा. नागपूर) असे मृत्यू झालेल्या सहाय्यकाचे नाव आहे. याप्रकरणी वसंत यमाजी रावते (वय 53, रा. जुन्नर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत रमेश वाडकर (वय 33, रा. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा गेडाम या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शिवशाही बसमधील ऑईल चेक करीत होत्या. त्याच वेळी परतूर (जालना) आगाराची बस पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र अहमदपूर (लातूर) आगाराची बस त्या ठिकाणी उभी असल्याने परतूर बसचा वाहक प्रशांत वाडकर हा अहमदपूर आगाराच्या बसमध्ये गेला.
त्याने विनापरवाना बस सुरु केली. मात्र बसमध्ये हवा कमी असल्याने बसचा ब्रेक लागला नाही. ती बस शिल्पा गेडाम ऑईल चेक करीत असलेल्या शिवशाही बसवर जोरात आदळली. दोन्ही बसच्या मध्ये सापडून शिल्पा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.