वर्षाविहाराच्या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा – खासदार बारणे

0
108

धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा – श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदारांना पत्र

दि २ जुलै (पीसीबी ) चिंचवड – वर्षाविहाराच्या वेळी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करावी, अशी सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व मावळचे तहसीलदार यांना या संदर्भात पत्र दिले आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाचजण वाहून जाण्याची दुर्घटना मन हेलावणारी आहे. अशा पद्धतीच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तातडीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे बारणे यांनी पत्रात म्हटले आहे.

पर्यटकांची गर्दी होत असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच सुरक्षा विषयक सूचनांचे फलक लावण्यात यावेत. अतिउत्साही पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक तेवढे अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. धोकादायक ठिकाणी पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात यावी. पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात जीवरक्षकांची नेमणूक करण्यात यावी. त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी पर्यटकांना तातडीने मदत मिळू शकेल, अशा सूचना बारणे यांनी केले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, खंडाळा तसेच मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. पावसाळ्यामुळे डोंगरांवरून खाली झेपावणारे पांढरे शुभ्र धबधबे, खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि तुडुंब भरलेले जलाशय पर्यटकांना खुणावत असतात. मात्र काही अतिउत्साही पर्यटक त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी खबरदारी घेत नसल्यामुळे गंभीर दुर्घटना घडत आहेत, असे बारणे यांनी म्हटले आहे.