वर्षभरात केवळ 10 पुरुषांची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया

0
173

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरात कुटुंबनियोजनाच्या 2 हजार 425 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापैकी केवळ 10 पुरुषांनी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. 2 हजार 415 महिलांनी शस्त्रक्रिया केली आहे. यावरून कुटुंबनियोजन करण्यात पुरुष नकारात्मक असून, महिलाच आघाडीवर असल्याची स्थिती आहे. छोटे कुटुंब, सुखी कुटुंबासाठी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात महिलाच आघाडीवर आहेत.

पुरुषी अहंकारामुळे कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचा वाटा कमी असल्याची स्थिती आहे. एक किंवा दोन अपत्ये झाल्यावर महिलांनीच शस्त्रक्रिया करून घ्यावी, असा समज रूढ झाला आहे. पुरुषही शस्त्रक्रिया करू शकतात. याकरिता शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांना 1 हजार 451 रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील महिलांना 600 रुपये, त्यावरील संवर्गातील महिलांना 250 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. नसबंदी केली म्हणजे पुरुषत्व कमी होईल. यामुळे अनेक पुरुष शस्त्रक्रिया करीत नाहीत. महिलांनीच कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा समज झाला आहे. यामुळे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण कमी आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात वर्षभरात 2 हजार 425 कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळेदेखील काही प्रमाणात शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील वर्षी झालेल्या 2 हजार 425 शस्त्रक्रियेपैकी 2 हजार 415 शस्त्रक्रिया महिलांनी केल्या आहेत. यावरून कुटुंबनियोजन करण्यात महिलाच आघाडीवर असल्याची स्थिती आहे. वर्षभरात शहरात झालेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत महिलांचे प्रमाण 99.5 टक्के आहे. तर, गेल्या वर्षभरात शहरातील केवळ दहा पुरुषांनी शस्त्रक्रिया केली आहे. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण खूपच कमी असल्याची स्थिती आहे. वर्षभरात झालेल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण केवळ अर्धा टक्के आहे.