वर्धापनादिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठ्ठा धक्का..! आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार…

0
386

मुंबई,दि.१८(पीसीबी) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉटरिचेबल होत्या. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान आज रात्री साडे नऊ वाजता मनिषा कायंदे शिवसेनेत सामील होणार आहेत.

मनिषा कायंदे यांच्यासोबत २ माजी नगरसेवकदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ येथे हा प्रवेश पार पडणार आहे. ठाकरे गटाचे आणखी काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी मोठं मोठे प्रवेश शिवसेनेत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

शिशिर शिंदे यांचा राजीनामा –
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते ठाकरे गटाला पुन्हा ‘जय महाराष्ट्र’ करुन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार झटका बसला आहे. आपल्या पक्षात मनासारखं काम करायला मिळत नसल्याची तक्रार यावेळी शिशिर शिंदे यांनी केली. शिशिर शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपावला आहे.

मनसेची स्थापना झाल्यावर शिशिर शिंदे शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यास गेले होते. त्यानंतर १९ जून २०१८ रोजी शिशिर शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. साधारण ४ वर्षे त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी नव्हती. मात्र
एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर 30 जून 2022 रोजी शिशिर शिंदे यांची उपनेतेपदी वर्णी लागली होती.
चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या ही खंत शिशिर शिंदे यांनी बोलून दाखविली. मला जबाबदारी नसलेले शोभेचे शिवसेना उपनेते पद मिळाले. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटानं दुर्लक्ष केले. त्यामुळे माझी होणारी घुसमट मी थांबवत असल्याचे ते यावेळी म्हणाले.