वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने महिलेला गंडा

0
358

रावेत, दि. ४ (पीसीबी) – सातारा जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल यांचे नाव वापरून एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रावेत येथे घडला.

रमा विजय खंडकर (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दीई आहे. त्यानुसार 9368317294 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून तो आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यावरून सहा व्यवहार झाले असून त्याचा गैरवापर झाला आहे, असेही फोनवरील ठगाने महिलेला सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून संशयित सहा व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी 98 हजार 326 रुपये सुरक्षा ठेव म्हणून मागितले. महिलेने देखील सहा व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पाच लाख 89 हजार 956 रुपये दोन बँक खात्यांवर पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. महिलेने पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

अजयकुमार बन्सल हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी गडचिरोली येथे काही वर्ष काम केले आहे. तसेच ते सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. अत्यंत धडाडीचे, शिस्तप्रिय आणि पोलीस दलात अतिशय चांगली प्रतिमा असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे नाव वापरून काही अनोळखी व्यक्ती नागरिकांची फसवणूक करीत आहेत.