दि.०५(पीसीबी)-वांद्र्यानंतर आता वरळीमध्येही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेतून कामगार युनियनच्या वर्चस्वावरून मोठा संघर्ष उफाळून आला आहे. सेंट रेजिस हॉटेलमध्ये निर्माण झालेल्या या वादामुळे परिसरावर तणावाचे सावट पसरले होते. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आमनेसामने येत घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि तणावाचा उच्चांक गाठला.
ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेली दहा वर्षे सेंट रेजिसमध्ये भारतीय कामगार सेना सक्रिय असून युनियनचे वर्चस्व त्यांच्याकडेच असल्याचे ठामपणे सांगितले. “भाजप बेकायदेशीररीत्या युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी करत आंदोलन छेडले.मात्र, भाजपने यास सरळ प्रत्युत्तर दिले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला की, “कामगारांना न्याय मिळत नसल्याने ते स्वेच्छेने आमच्या युनियनमध्ये सामील होत आहेत”. हॉटेल प्रशासनाशी चर्चा करून त्यांनी आपला बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला.
हा संपूर्ण प्रकार वांद्रेतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या संघर्षाचीच पुनरावृत्ती असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.तणाव वाढताच पोलीस दलाच्या मोठ्या फौजा घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अखेरीस भाजपने सेंट रेजिस हॉटेलच्या परिसरात आपला बोर्ड लावण्यात यश मिळवले, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.वरळीतील या संघर्षामुळे पुन्हा एकदा मुंबईतील कामगार युनियन राजकारण पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













































