वयाच्या पंधराव्या वर्षी जागतिक स्तरावरील कोडिंग स्पर्धा जिंकून ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज

0
634

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – नागपूरकर वेदांत राजेश देवकते याने वयाच्या पंधराव्या वर्षी जागतिक स्तरावरील कोडिंग स्पर्धा जिंकून ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज असलेली इन्फोलिंक्स कंपनीची नोकरी मिळविण्याचा इतिहास रचला आहे. वय कमी असल्यामुळे वेदांत या नोकरीस अपात्र ठरला असला तरी भविष्यात त्याच्यासाठी आमची दारे सदैव खुली असल्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

रमणा मारोती येथे राहणारा वेदांत हा वाठोड्यातील नारायणा ई-टेक्नो शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील राजेश देवकते हे उमरेड येथील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक तर आई अश्विनी देवकते या नंदनवन येथील प्रियदर्शिनी जे. एल. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. इतर मुलांप्रमाणे त्याला मोबाइल, लॅपटॉपचे आकर्षण आहे. दहावीचे वर्ष असल्याने आई-वडील मोबाइल, लॅपटॉपपासून त्याला दूर राहायला सांगायचे. मात्र, जे टाळण्यास सांगितले त्याच लॅपटॉपमुळे वेदांतने आश्चर्यकारक कामगिरी करून दाखविली. याबाबत अधिक सांगताना तो म्हणाला, ‘लॅपटॉपवर इन्स्टाग्राम ब्राउझ करीत असताना वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेची लिंक सापडली. आवड असल्यामुळे स्पर्धेत सहभागी झालो. जगभरातून एक हजारहून अधिक स्पर्धक होते. मी त्यांना मागे टाकत दोन दिवसांत २,०६६ ओळींचा कोडिंग प्रोग्राम लिहून दिला. माझ्यातील कोडिंग करण्याची क्षमता पाहून न्यूजर्सी येथील इन्फोलिंक्स या जाहिरात क्षेत्रातील कंपनीने एचआर पदासाठी वार्षिक ३३ लाखांच्या नोकरीचे ऑफर लेटर मेलवर पाठविले. सुरुवातीला ही ऑफर फेक असल्याचा संशय आला. खातरजमा केली असता खरोखर ही ऑफर मिळाल्याचे कळले. आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब असून भविष्यात नक्कीच अधिक चांगले प्रयत्न करणार आहे.’

कोडिंग स्पर्धेत भाग घेतल्याचे वेदांतने आईवडिलांना सांगितले नव्हते. याबाबत त्याने शाळेचे अॅकेडमिक डीन संदीप शर्मा, मुख्याध्यापिका राणी भुयार आणि आवडते शिक्षक सुशांत बरगत यांना कल्पना दिली होती. ऑफर लेटर आल्यानंतर वेदांतच्या पालकांना या स्पर्धेबद्दल कळले. या संपूर्ण प्रक्रियेत शाळेने भरपूर सहकार्य केल्याची भावना वडील राजेश देवकते यांनी व्यक्त केली.’तुमचा अनुभव, व्यावसायिकता आणि दृष्टिकोन पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. टीमला तुमचे सादरीकरण आवडले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी संपर्क करावा. आमची दारे तुमच्यासाठी नेहमी खुली असतील’, असे इन्फोलिंक्स या अमेरिकन कंपनीने वेदांतला पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.

वेदांतने animeeditor.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. ही वेबसाइट यूट्युबसारखे व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय देते. यात ब्लॉग, चॅटबॉक्स, व्हिडीओ पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. या वेबसाइटवर प्रोफाइल एडिट करता येतात. लाइव्ह फॉलोअर्स आणि लाइक्स मिळवण्याचाही पर्याय आहे. वेदांतने शाळेत विज्ञान प्रदर्शनात रडार प्रणालीचे मॉडेल तयार केले होते. यासाठी त्याला सुवर्णपदक मिळाले होते. वेदांतने लॉकडाउनच्या काळात सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडिंग आदी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.