वडिलांनी मारले म्हणून घरातून रुसून गेलेल्या 12 वर्षीय मुलीवर झाला लैंगिक अत्याचार

0
282

चाकण, दि. ८ (पीसीबी) – वडिलांनी मारले म्हणून मध्यरात्री 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली. ती झाडात लपून बसली असता तिथे आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार दोन वर्षांपूर्वी लेबर कॉलनी, चाकण येथे घडला.

पीडित 12 वर्षीय मुलीने याप्रकरणी 7 जून 2022 रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांच्या कायदेशीर रखवालीतून अल्पवयीन मुलीला अज्ञातांनी पळवून नेल्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पीडित मुलगी मध्य प्रदेश येथील किलोड मध्ये 22 एप्रिल रोजी सापडली. तिला ताब्यात घेऊन चाकण पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे चौकशी केली असता तिला कोणीही पळवून नेले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी देखील तक्रार गैरसमजुतीने दिली असल्याचे सांगितले.

त्यानंतर रुटीनचा भाग म्हणून पोलिसांनी त्या 12 वर्षीय मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालय पुणे येथे नेले. तिथे तिने वैद्यकीय अधिका-यांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिला मारले म्हणून ती रुसून रात्री बारा वाजताच्या सुमारास आयफीलसिटीच्या पाठीमागे झाडात जाऊन बसली. तिथे तिघेजण आले. त्यांनी काळ्या रंगाचे मास्क लावले होते. त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.’

असे मुलीने सांगितले असल्याने पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांची गुन्ह्यात वाढ केली. दरम्यान वैद्यकीय अहवाल आला असता त्यात पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे सांगितले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.