वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच आपल्या आईचे लग्न दिले लावून, कोल्हापुरातील घटना…!

0
461

कोल्हापूर, दि.१६ (पीसीबी) : कोल्हापूरने काही दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न घालून दिला आहे. आता या विधायक उपक्रमावर कळस ठरेल, असा आदर्श अवघ्या बारावी शिकलेल्या शिंगणापुरातील तरुणाने घालून दिला आहे. वडिलांचे अकाली छत्र हरवल्यानंतर मुलाने स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या आईचे लग्न लावून दिले आहे. आईचा दुसरा विवाह लावून देणाऱ्या मुलाचे नाव युवराज शेले असे आहे.

युवराजच्या आईवडिलांचे म्हणजे नारायण आणि रत्ना यांचे २५ वर्षापूर्वी लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षातच युवराज जन्माला आला. वडिल सेंट्रिग काम करायचे. तर आई घरकाम करत त्यांना मदत करायची. दोघांचा संसार अतिशय सुखाने सुरू होता. सारं काही व्यवस्थित असतानाच दोन वर्षापूर्वी कामावर असताना नारायण यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सौभाग्य गेल्याने तीचे मन दुखावले, ती सतत निराश दिसू लागली, समाजात तिला विधवा म्हणून वेगळी वागणूक मिळू लागली, तेवीस वर्षाच्या एकुलत्या एका मुलाला आपल्या आईची ही अवस्था पाहवेना. हे सारं पाहून त्याने आईचे दुसरं लग्न लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि वर संशोधन सुरू केले.

शेतकरी असलेला एक पाहुण्यातीलच व्यक्ती त्याला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू केली. आईला त्याने ही गोष्ट सांगितली. तिने स्पष्ट नकार दिला. पण काही दिवस रोज तो तिची समजूत काढू लागला. मुलाच्या हट्टामुळं शेवटी आई लग्नाला तयार झाली.

रत्ना यांनी ही गोष्ट पाहुण्यासह गल्लीतील काही महिलांच्या कानावर घातली. सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला. आणि दोन दिवसापूर्वी पैपाहुणे, शेजाऱ्यांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. युवराजची इच्छा पूर्ण झाली. आईच्या आयुष्यात पती म्ह्णून ‘मारूती’ पावला. आणि त्यांचा विवाह १२ जानेवारीला पार पडला व युवराजला नवीन वडील मिळाले. पुन्हा एकदा नवा संसार सुरू झाला. त्याच्या या धाडसी निर्णयाने कोल्हापूरने पुरोगामी चळवळीत आणखी एक नवे पाऊल टाकले हे खरे.

दरम्यान, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने आणि अजरामर कर्तृत्वाने पावन झालेल्या कोल्हापूरने राज्यालाच नव्हे, तर देशाला पुरोगामी वाटचालीचा वारसा घालून दिला आहे. पुरोगामी भूमिकेवर गप्पा मारण्यास खूप सोप्या आहेत. किंबहुना त्या काहीवेळा त्या भरल्या पोटावरील गप्पा वाटू लागल्या आहेत.

त्यामुळे युवराजने आईसाठी उचललेले पाऊल निश्चितच कोल्हापूरच्या पुरोगामी वाटचालीत मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही