वडगाव मावळ,दि.२२(पीसीबी) – वडगाव मावळ मधील माळीनगर येथे जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या विद्युत रोहित्रांच्या खांबाची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. प्रमुख रोहित्राच्या वरील वाहक तारा जोडणारा खांब हा ८० अंशापेक्षाही अधिक झुकलेला असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती नागरिकांना आहे. या खांबावरील विद्युत तारा ह्या माळीनगर व वडगावला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरून जातात.
माळीनगर व वडगावला जोडणाऱ्या ह्या रस्त्यावर नेहमीच लहानमुलांची, सायकलस्वारांची, वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ असते. नेमक्या याच रस्त्यावरून ह्या रोहित्राच्या तारा पुढील खांबाकडे जातात. अनेक दिवसांपासून हा खांब अश्या धोकादायक पद्धतीने झुकलेला आहे आणि अजूनही झुकत आहे. जर हा खांब तुटून विद्युत तारा रस्त्यावर पडल्या तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान ग्रामपंचातीवरून वडगाव मावळची नगरपंचायत झाली. मावळ तालुक्यातील अनेक गावं आज वडगाव मावळचा आदर्श घेत आहेत. वडगावातील अनेक भागातील रस्ते सुसज्ज झाल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. असं सर्व असताना कोणत्याही कारणाने वडगावच्या नावाला गालबोट लागू नये असं येथील नागरिकांना वाटतं. म्हणूनच लवकरात लवकर तुटलेल्या खांबाची दुरुस्ती करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.