वज्रमूठ सभा रद्द म्हणजेच महाआघाडीचे वाजले ?

0
421

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे काय होईल, अशीही चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीची पुण्यातील वज्रमुठ सभा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीची मोट शरद पवार यांनी बांधली आहे. त्यांच्यामुळे आघाडी स्थापन झाली. पवार अध्यक्षपदापासून पायउतार झाले तर आघाडीचे काय होणार, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील वज्रमूठ होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “पावसामुळे सभेबाबतचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. याबाबत बैठकीत निर्णय होईल. पुण्यातील वज्रमूठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही,” पुण्याच्या वज्रमूठ सभेबाबत नाना पटोले यांनी केलेल्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. समाज माध्यमांवर नाना पटोले यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीवरही त्याचा परिणाम होईल असं बोललं जात आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होईल, अशी विरोधकांकडून टीका होत आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर तिन्ही पक्षामध्ये समन्वय साधने कठीण होईल, अशी शक्यता वर्तवला जात आहे.

नाना पटोले म्हणाले, “आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तर ते लोक आमच्याकडे आले होते. सोनिया गांधी यांच्याकडे आले होते, त्यामुळं कोणाच्या मध्यस्थी ने तेव्हा सरकार झाले, हेही सर्वांना ठाऊक आहे. तेव्हा आम्ही केवळ सत्तेसाठी नव्हतो. पहाटेचे सरकार आले. राज्याला कलंक लावण्याचं काम झालं. हे महाराष्ट्राने बघितलं, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता, पहाटेच सरकार कुणाचं होतं, हेही सर्वांना माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बोट दाखवलं.

“पवारांचा राजीनामा हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यावर काही बोलावं असं वाटत नाही, जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा त्याच्याशीच काय ते बोलेन. राष्ट्रवादी चा पुढचा अध्यक्ष कोण होईल, याकडे आम्ही बघत नाही. कारण दुसऱ्यांच्या घरात आम्ही डोकावत नाही. ते ज्यांचे काम आहे, ते चोख बजावत आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला हाणला.