वंचित बहुजन आघाडी आता गॅस सिलेंडर या नव्या चिन्हाने मैदानात उतरणार

0
115

मुंबई, दि. १६ – आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा, दौरे सुरू आहेत अशातच मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी हे गॅस सिलेंडर या नव्या चिन्हाने मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला गॅस सिलेंडर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला निरनिराळी निवडणूक चिन्हे
१९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळे निवडणूक चिन्ह देण्यात आली होती. लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघांत ‘वंचित’ला तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती.

निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह दिले होता.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ‘वंचित’ला एकच निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले होते. आता विधानसभेला निवडणुक आयोगाने गॅस सिलिंडर चिन्ह दिलं आहे.