घरच्या बाहेर खाटेवर झोपलेल्या एका शेतकऱ्याच्या डोक्यात दगड किंवा तीक्ष्ण हत्यार मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून आज मंगळवारी (ता.1) सकाळी उघडकीस आली आहे. रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45 पत्ता – वडाळे वस्ती , टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र काळभोर हे लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. काळभोर हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळभोर हे घराच्या अंगणातील खाटेवर झोपत होते.दरम्यान, काळभोर हे नेहमीप्रमाणे सोमवारी (31 मार्च) रात्री खाटेवर झोपले होते. मंगळवारी सकाळी काळभोर यांना उठविण्यासाठी आवाज दिला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरच्यांनी खाटेजवळ येऊन पहिले असता, काळभोर यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्याचे आढळून आला आहे. तसेच ते खाटेवरतीच निचपित अवस्थेत पडले होते.या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार चंद्रधर शिरगिरे, प्रदीप गाडे, सूरज कुंभार, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.