लोकोत्सवातून होते भारतीय संस्कृतीची ओळख – आमदार उमा खापरे

0
9

लोकोत्सवात घडले महाराष्ट्र – ओरिसा मधील आदिवासी संस्कृतीचे दर्शन

पिंपरी, दि. २२ पीसीबी –भारताला दैदिप्यमान सांस्कृतिक, सामाजिक परंपरा लाभलेल्या आहेत. सांस्कृतिक वारसा जोपासत हा अमूल्य ठेवा देशातील जनतेसमोर आणण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला सांस्कृतिक परंपरांची माहिती मिळते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आयोजित केलेल्या लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी कला, संस्कृती पाहण्याची संधी मिळाली. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची उत्तम भूमिका पार पाडली आहे, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओरिसा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सव साजरा होत आहे. लोकोत्सवाचे पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने समन्वयक म्हणून काम केले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे शुक्रवारी आदिवासी कला उत्सव साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या पुणे विभागीय अधिक्षक जान्हवी जानकर, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, मल्लाप्पा कस्तुरे, क्रांतिकारक चाफेकर स्मारक समितीचे आसाराम कसबे, भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळुंज आदी उपस्थित होते. ओरिसा येथील कौशल फोक ग्रुप, विरेंद्र पंडायन ग्रुप मधील कलाकारांनी थापा नृत्य, रंगावती नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. नाशिक येथील आदिवासी कलाकारांनी आदिवासी घोडा नृत्य तर पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा येथे कलाकारांनी तारपा हे बहारदार नृत्य सादर केले. यावेळी नवगंध दास, वामन जानू माळी आणि सहकारी यांचा आ. उमा खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे समन्वयन श्री प्रवीण तुपे गजानन चिंचवडे, सुनील पोटे आदींनी केले. सूत्रसंचालन अविनाश आवटे आणि आभार अनिल गालिंदे यांनी मानलेपीसीबी