लोकांना दोष देण्यापेक्षा यंत्रणा कुठे कमी पडते, याचा शासनाने अंतर्मुख होऊन विचार करावा – सयाजी शिंदे

0
250

‘इंडियन स्वच्छता लिग’ या मोहिमे अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी प्लॉगेथॉन मोहीम

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – स्वच्छतेची मोहीम राबविताना पर्यावरण संवर्धनाला  देखील महत्व दिले पाहिजे. सर्वांना श्वास घ्यावा लागतो, अन्नाची गरज असते. या सर्व गोष्टी आपल्याला झाडांच्या माध्यमातून मिळतात. झाडांएवढे जगात कुणीही मोठे नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देतानाच
लोकांना दोष देण्यापेक्षा यंत्रणा कुठे कमी पडते  याचा शासनाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा पर्यावरणप्रेमी  सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज (शनिवारी) स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त ‘इंडियन स्वच्छता लिग’ या मोहिमे अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा प्रारंभ सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा पर्यावरणप्रेमी  सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या लिग साठी महापालिकेचा ‘पीसीएमसी पायोनिअर्स’ संघ तयार करण्यात आला असून आयुक्त शेखर सिंह हे संघप्रमुख आहेत. अभिनेते शिंदे आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर तसेच भोसरीतील गावजत्रा मैदानावर स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दुर्गादेवी टेकडी आणि भोसरी सहल केंद्र येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले.

गरजेपेक्षा अधिक लोक शहरात वास्तव्य करत असल्यामुळे त्यातून समस्या देखील निर्माण होतात. कळतं पण वळत नाही अशा परिस्थितीत जगावे लागते, असे सांगून सयाजी शिंदे म्हणाले, काही लोक उघड्यावर कचरा फेकतात आणि आपण मात्र स्वच्छतेचे गुणगान गात बसतो. दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा आधी स्वतः कृतीशील झाले पाहिजे. कचरा करणारे जास्त असून कचरा उचलणारे कमी आहेत. इथेच खरा घोळ असून त्यामुळेच कचरा संकलनाच्या मोहिमा राबवाव्या लागतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे सयाजी शिंदे म्हणाले.

आपण सर्व एकमेकांसोबत चांगले राहूया. सफाई कर्मचा-यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.  लोकांना दोष देण्यापेक्षा यंत्रणा कुठे कमी पडते  याचा शासनाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून घरात आलेल्या  पॅकिंगमधून अप्रत्यक्षपणे प्लास्टिक घरात येत असते, याचाही विचार प्रत्येकाने गंभीरतेने केला पाहिजे. प्रत्येक जण व्यावसायिक झाला आहे, मनुष्यच मनुष्याला फसवत असल्यामुळे आपल्याला स्वच्छता राखता येत नाही, हे आपले दुर्दैव आहे, अशी खंत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. या  परिस्थितीचा विचार करून  पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच  स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नागरी सहभागाशिवाय कोणतीही मोहीम यशस्वी होणे शक्य नाही. महापालिकेची सर्व यंत्रणा स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करत असून  प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शहरामध्ये स्वच्छताविषयक खूप चांगले काम सुरु आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाचा वाटा असून या चळवळीत योगदान देणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो.  ही प्रक्रिया निरंतर सुरु असून  शहराला  देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये हे शहर भारतातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ,सुंदर शहर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त ‘इंडियन स्वच्छता लिग’ या मोहिमे अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली होती. सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्लॉगेथॉन मोहीमेची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेवून करण्यात आली.  या स्वच्छता मोहीमेमध्ये  रस्त्यावरील प्लास्टिक कचरा आणि इतर कचरा गोळा करत, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची जागृती करत तसेच दुकानदारांना कचरा रस्त्यावर न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.  गणेशोत्सवामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केलेल्या गणेश मंडळांचा प्रशस्तीपत्रक देउन सन्मान करण्यात आला.

दुर्गादेवी टेकडी येथील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, प्रमोद ओंभासे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त अजय चारठाणकर, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आयुक्त वामन नेमाणे, सहायक आयुक्त विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.