लोकसभा निवडणूक १६ एप्रिल रोजी होणार, निवडणूक आयोगाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

0
171

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – देशात लोकसभा निवडणूक याच वर्षी होणार आहे. इंडिया आघाडी आणि भाजपा असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीची जय्यत तयारी सगळ्यांकडूनच सुरु आहे. अशात १६ एप्रिल या दिवशी निवडणुका होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण सध्या निवडणूक आयोगाचं एक पत्र व्हायरल होतं आहे. या पत्रात १६ एप्रिल २०२४ या दिवशी लोकसभा निवडणुका घेतल्या जातील असं म्हटलं गेलं आहे. निवडणूक आयोगाचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हा दावा मात्र फेटाळला आहे. निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख यांचा आराखडा ठरवण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. निवडणूक १६ एप्रिलला होणार याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सीईओनी ही पोस्ट केली आहे. पत्रात देण्यात आलेली तारीख संदर्भासाठी आहे बाकी काहीही नाही.

दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलय की, ‘@Ceodelhioffice च्या एका पत्राचा हवाला देताना सांगितलं की, २०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येतय की, जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती. आत्तापर्यंत निवडणुकीचा आराखडा नक्की झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.