लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात भाजपला इतक्या जागा मिळतील

0
191

पुणे, दि. ८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. यातच महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत ओपिनियन पोल म्हणजेच जागांचा आढावा घेणारा एक ताजा सर्व्हे समोर आला आहे. या सर्वेक्षणातील अंदाजानुसार भाजपप्रणित एनडीए आघाडी पुढे असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीसाठी परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स या संस्थेकडून हा सर्व्हे करण्यात आला.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांवर भाजप एकूण 32 टक्के मतांनी आघाडीवर आहे. त्याचवेळी शिवसेनेला (शिंदे गट) 10 टक्के आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 टक्के मते मिळतील, असा अंदाज या सर्व्हेत सांगितला आहे. केवळ 15 टक्के मतांसह काँग्रेस येथे पिछाडीवर असल्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेचीही अवस्था काहीशी नाजूक आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 12 टक्के मते मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी उद्धव यांच्या शिवसेनेला 15 टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. 11 टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात, असा दावा या सर्व्हेतून करण्यात आला आहे.
सर्व्हेतून करण्यात आलेल्या दाव्यानुसार एकूण मतांची टक्केवारी जागांमध्ये रूपांतरित झाल्यास भाजपला 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जी कोणत्याही पक्षापेक्षा सर्वाधिक आहेत. त्याचवेळी शिवसेनेला (शिंदे गट ) 4 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) २ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला या वेळी 9 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला आठ जागांचा फायदा होताना दिसत आहे. शिवसेनेला (ठाकरे गट) 8 जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज या सर्व्हेतून मांडण्यात आला आहे.