सुपे , दि. १४ (पीसीबी) – माझा विकास कामाचा जेवढा आवाका आहे, तेवढा कोणाचाच नाही. निवडणूक आल्या म्हणून मी बोलत नाही, काम बोलते. राज्यात मला फिरायचे आहे. त्यामुळे उद्याच्या लोकसभा निवडणूकीत माझ्या विचारांचा उमेदवार विजयी करा. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे (ता. बारामती) येथील सभेत बोलताना व्यक्त केले.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील नवीन उपबाजार इमारतीचे भूमिपुजन, छत्रपती शिवाजीमहाराज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बारामती तालुका महायुती मित्र पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तालुका दौऱ्यात तालुक्यात सात ठिकाणी जाहिर सभांचे आयोजन केले होते. या दौऱ्यात सुप्यातील माऊली कार्यालयात झालेल्या सभेत श्री. पवार बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) संभाजी होळकर, श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, विश्वास देवकाते, भरत खैरे, सरपंच तुषार हिरवे, महेश चांदगुडे आदींसह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आजच्या दौऱयात त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपुजन, उद्घाटने केली. त्यामुळे सुप्यात सकाळी साडेआठच्या सुमारास होणारी सभा दुपारी साडेबाराच्या दरम्यान सुरू झाली.
श्री. पवार म्हणाले – राज्याच्या तुलनेत केंद्राचा निधी अधिक असतो. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करू शकतो. या भागाचा कायापालट करण्यासाठी आपल्या विचारांचा खासदार असावा. भावनिक न होता मतदान करा. लोकसभेला सुप्रिया सुळे व विधानसभेला अजित पवार अशी चर्चा लोकांमध्ये आहे. या चर्चेबाबत पवार म्हणाले – लोकसभेला एक व विधानसभेला एक असे मला चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनाई, शिरसाई व पुरंदर उपसा जल सिंचन योजनांच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. सुमारे २५ एकर जागा उपलब्ध झाली तर सौर उर्जेचा प्रकल्प राबवता येईल. त्याचा लाभधारकांना फायदा होईल. कांद्याच्या भावाबाबत बोलताना पवार म्हणाले ग्राहक व उत्पादकांचा विचार करावा लागला आहे. येथील शिवपुतळा सुशोभिकरणाचे काम मार्गी लावण्याचे सुतोवाच त्यांनी केले. मात्र, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
उपबाजार इमारत भूमिपुजना दरम्यान येथील रस्ते, गाळे, इमारती बांधकामाची त्यांनी माहिती घेतली. आवारात झाडे लावण्याच्या सुचना त्यांनी केल्या. सभापती सुनिल पवार, उपसभापती निलेश लडकत यांनी स्वागत केले. तर छत्रपती शिवाजीमहाराज सोसायटीच्या इमारत उद्घाटनानंतर संस्थेचे अध्यक्ष विजय चांदगुडे, जालिंदर चांदगुडे, नंदकुमार चांदगुडे, सचिव लक्ष्मण चव्हाण आदींकडून त्यांनी बांधकामाची माहिती जाणून घेतली. स्वनिधीतून चांगले बांधकाम केल्याबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिरायती भागात अशा संस्था चालवणे जिकीरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.