लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या

0
289

महाराष्ट्र, दि. १५ (पीसीबी) – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्याचा दावा नवनीत राणांनी केला होता. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांच्या वक्तव्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “नवनीत राणा यशोमती ठाकूर यांना २०१९ साली पैसे दिल्याचा विषय काढत आहेत. हे चुकीचं आहे. सर्वात पहिल्यांदा पैसे देणारा चुकीचा आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.”

“कारण, नवनीत राणांनी हे वक्तव्य सर्वांसमोर केलं आहे. त्यामुळे रवी राणांनी किती पैसे यशोमती ठाकूर यांना दिले आहेत. अथवा ठाकूर यांनी किती पैसे घेतले? याची चौकशी झाली पाहिजे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

नवनीत राणा काय म्हणाल्या?
“लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर यशोमती ठाकूर यांनी प्रचार केला. तर, रवी राणांकडून ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं,” अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.
नवनीत राणांच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “राणा दाप्मत्याचं अमरावतीत कोणाशीच पटत नाही. मागे आमदार बच्चू कडूंबाबत बोलले, मग त्यांनी माफी मागितली. यांनी प्रत्येकावर आरोप केले. आमदार बळवतंराव वानखेडेंबाबत बोलले, मग भाजपा नेते प्रवीण पोटेंबाबत बोलले. मुळात हे (राणा दाम्पत्य) काय दुधाने धुतलेले आहेत का? हीच सगळ्यात घाणेरडी मंडळी आहे. त्यामुळे मी यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. कारण, असं कोणीही काहीही सहन करणार नाही.”