पिंपरी, दि.८ (पीसीबी)- भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, आमदार महेश लांडगे यांना शिरुर, आमदार राहुल कूल यांना बारामती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे जबाबदारी दिली तेच कदाचित भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतील, असेही सांगण्यात येते.
विविध संस्था संघटनांच्या सर्वेक्षणात भाजपला ४८ पैकी फक्त १० जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आल्याने मोदी-शाह यांंच्या पासून फडणवीस-बावनकुळे कामाला लागले. महाआघाडीने खरोखर एकास एक उनमेदवार दिला तर काळ कठिण असणार आहे, अशी कल्पना आल्याने भाजप सर्व ताकदिनीशी तयारीला लागली आहे. शिंदे गटाच्या १३ खासदारांंची शिंदे यांचा फोटो आणि धनुष्य चिन्ह घेऊन लढण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे या सर्वांंना आगामी काळात भाजपच्या कमाळावर निवडणूक लढवावी लागणार असून तशी पर्यायी व्यवस्थाही भाजपमधून सुरू आहे. शिंदे गट शिवसेनेबाबत मतदार अनुकूल नसल्याने त्याचा फटका आपल्याला बसू नये यासाठी भाजपने सर्व मतदारसंघात संभाव्य उमेदवार तयार ठेवले असून त्यासाठीच नवीन नियुक्त्यांना महत्व आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतही अशेच निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात येणार आहेत.
कोण कोण निवडणूक प्रमुख?
मुंबई उत्तर – योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
मावळ – प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
जालना – विजय औताडे
लातूर – दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे
पुणे – मुरलीधर मोहोळ
बारामती – राहुल कुल
शिरुर – महेश लांडगे