देश,दि.२९(पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीला या वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाने निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलीकॉप्टरही आधीपासूनच बुक करुन ठेवल्याचा दावा ममता यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या एका रॅलीला संबोधित करताना हे विधान केलं. भाजपा सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आली तर देशामधील जनतेला ‘निरंकुश’ शासनाचा सामना करावा लागेल. नियोजित वेळापत्रकानुसार लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात होणं अपेक्षित आहे.
पश्चिम बंगालमधील बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यांसाठी ‘बेकायदेशीर मार्गांनी’ काम करणाऱ्या लोकांना ममता यांनी जबाबदार ठरवलं आहे. “काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने” ते असं करत आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. “भाजपा सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आली तर देशात निरंकुश शासनाचा सामना करावा लागेल. मला शंका आहे की त्यांना (भाजपाला) डिसेंबर 2023 मध्येच लोकसभा निवडणूक घेऊ शकते. भाजपाने पूर्वीच आपल्या देशातील समुदायांमध्ये कटूता निर्माण केली आहे. पुन्हा ते सत्तेत आले तर आपल्या देशातील द्वेष अधिक वाढेल,” असं ममता म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘भाजपाने आधीपासूनच सर्व हेलिकॉप्टर बुक करुन ठेवले आहेत,’ असं म्हटलं. अन्य राजकीय पक्षांना या हेलिकॉप्टर्सचा वापर करता येऊ नये या हेतूने असं केल्याचा दावाही ममता यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांचा रोख देशभरामधील हेलिकॉप्टर्सची बुकींग झाल्याच्या दिशेनं आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यामध्ये एका बेकायदेशीर फटका कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी, “काही लोक बेकायदेशीर कारवायांच्या माध्यमातून हे करत आहेत. काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना मदत केली जात आहे,” असा दावा केला. रविवारी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
यादवपुर विद्यापीठामध्ये ‘गोली मारो’च्या घोषणा देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवरही ममता यांनी टीका केली. विद्यापीठांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या घोषणा देणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचं ममता यांनी सांगितलं. “अशा घोषणा देणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की हा उत्तर प्रदेश नाही पश्चिम बंगाल आहे,” असं ही ममता म्हणाल्या.