लोकसभा निवडणुकांची तारिख ठरली ?

0
263

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या ‘इंडिया’ आघाडीत जागावाटपांवरुन घमासान घडून येत आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सुंदोपसुंदी सुरु असल्याचे चिन्ह आहे. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत भाकीत वर्तवले आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे निवडणुका 30 एप्रिलच्या आत लावतील, कारण त्यांना (भाजप) कोणीतरी सांगितलंय की, त्याच्या आत निवडणुका घेतल्या तर तुमचं काहीतरी होईल. 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे. महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीत होईल. राष्ट्रवादी, काँग्रेसशी बोलणी व्यवस्थित चालू आहे. लवकरच दिल्लीत बैठक होईल. ज्या काही अफवा पसरत आहेत, त्याकडे लक्ष देवू नका,’ असे ठाकरे म्हणाले.

संजय राऊतांचा 23 जागांवर दावा
‘महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत ज्या काही वावड्या उठत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका. आघाडीत जागावाटपाबाबत समन्वय आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. राज्यातल्या 48 जागांवर मेरिटनुसारच आघाडी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. जिंकेल त्यांची जागा हे सूत्र सुरुवातीपासूनच आहे. शिवसेनेची (ठाकरे गट) भूमिका कायम राहिली की 23 जागा लढवणारच, याच्यावर कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीच्या आमची चर्चा सुरू आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर आले होते. आमच्यात दोन-अडीच तास जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली. यावर एकत्रितपणे चर्चा होत राहिल. काही लोक अफवा पसरवत आहेत, ते चुकीच्या आहेत.