लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्लाच

0
137

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी आज एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा अध्यक्षाच्या नावाची चर्चा करण्यात आली. यावेळी ओम बिर्ला यांच्या नावावर सर्वांनी संमती दर्शविल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ओम बिर्ला यांचा लोकसभा अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होणार आहेत.

आज दुपारी 12 वाजेपर्यंत ओम बिर्ला आपला अर्ज भरतील. त्यांच्यासोबत एनडीएचे वरिष्ठ नेतेही असणार आहेत. थोड्याच वेळात बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच इंडिया आघाडी उमेदवार देणार की नाही? यावर अजूनही सस्पेन्स आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. इंडिया आघाडीने उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या नावावर सर्वसंमत्ती बनवण्याचा एनडीएने प्रयत्न सुरू केला आहे. भाजपने ही जबाबदारी राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांच्यावर सोपवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष एकमताने निवडला जावा म्हणून राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना फोन केला होता. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि टीमसी नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली आहे. याशिवाय एनडीएच्या घटक पक्षांचाही विचार घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

ओम बिर्ला यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1962 रोजी झाला. ओम बिर्ला एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी 2019मध्ये 17व्या लोकसभा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. 2014मध्ये ते राजस्थानच्या कोटा-बूंदी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2003 ते 2014 पर्यंत ते कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. भाजपच्या युवा शाखेतून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. विद्यार्थी जीवनापासूनच ते चळवळीमध्ये सहभागी होते.