लोकसंख्येत भारत “चीन” ला मागे टाकणार ?

0
207

देश,दि.१५(पीसीबी) – चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या चीन सर्वाधिक लोकसंख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, लवकरच भारत याबाबतीत चीनला मागे टाकणार आहे. संयुक्त राष्ट्रने जाहीर केलेल्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार पुढील वर्षापर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार आहे.

संयुक्त राष्ट्राने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने हा अहवाल जारी केला. या अहवालानुसार, नोव्हेंबर २०२२ पर्यंत जगाची लोकसंख्या ही ८ अब्ज होण्याची शक्यता आहे. अहवाल पाहता सध्या आशिया खंडात जगातील ६१ टक्के लोकसंख्या आहे. सध्या आशिया खंडात ४.७ अब्ज लोक राहतात. तर यानंतर आफ्रीकेत १.३ अब्ज म्हणजेच १७ टक्के लोकसंख्या आहे. त्यानंतर ७५ कोटी लोक म्हणजेच १० टक्के लोकसंख्या युरोपमध्ये आहे. तर, लॅटिन, अमेरिका आणि कॅरेबिअन देशात ६५ कोटी लोक म्हणजेच ८ टक्के लोकसंख्या, उत्तर अमेरिकेत ३७ कोटी लोक आणि ओशिनीयामध्ये ४.३ कोटी लोक राहातात.

जागतिक लोकसंख्या संभावना २०१९ (World Population Prospects 2019)नुसार सध्या चीनमध्ये १.४४ अब्ज लोकसंख्या असून पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर १.३९ अब्ज लोकसंख्येसह भारत आहे. जगातील एकूण लोकसंख्येत चीनची १९ टक्के तर भारताची १८ टक्के भागीदारी आहे. अहवालानुसार, २०२३ पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक असेल. तर, चीनची लोकसंख्या २०१९ ते २०५० पर्यंत ३.१४ कोटी म्हणजेच जवळपास २.२ टक्क्यांनी कमी होईल.

युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्सच्या अंदाजानुसार, १९५० नंतर जगातील लोकसंख्या सध्या सर्वात कमी वेगाने वाढत आहे. या अहवालाच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या ८.५ अब्ज होईल. त्याचप्रमाणे २०५० पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या ९.७ अब्ज आणि २०८० मध्ये ती सुमारे १०.४ अब्जावर पोहोचेल. अहवालानुसार, यानंतर २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या याच पातळीवर स्थिर राहील.

अनेक विकसनशील देशांमध्ये जन्मदरात घट झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र, काही देशांमध्ये हा दर वाढत आहे. अहवालानुसार, लोकसंख्या वाढीसाठी केवळ ८ देशांची ५० टक्क्यांहून अधिक हात असेल. हे आठही देश आशिया आणि आफ्रिकेतील आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, येत्या काही वर्षांत ज्या आठ देशांची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि टांझानिया हे ते ८ देश असतील.