लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने एकत्र यावे.. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे – अजित गव्हाणे

0
378

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – सत्तेसाठी तात्कालीन काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या भाजपाने गेल्या 9 वर्षांत काँग्रेसवरील एकही आरोप सिद्ध केला नाही. येणार्‍या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसून लागल्याने राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रकार भाजपने केला आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असून लोकशाही टिकविण्यासाठी जनतेनेच आता एकत्र येण्याची वेळ आल्याची भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मांडली आहे.

मोदी या आडनावाविषयी टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने 30 दिवसांचा अवधी दिलेला असतानाही राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तीव्र निषेध करत अजित गव्हाणे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, राहूल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्याच आहे. सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने काँग्रेसवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यापैकी एकही आरोप केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला सिद्ध करता आलेला नाही. भारत जोडो यात्रेमुळे राहूल गांधी यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची भिती वाटू लागली आहे. याच भितीपोटी आणि सत्तेच्या जोरावर राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करून त्यांना संसदेबाहेर काढण्याचे पाप भाजपने लोकसभा सचिवालयाच्या माध्यमातून केले आहे.

भाजपमधील वाचाळवीरांकडून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर एकही शब्द काढला जात नाही. मात्र महापुरुषांचा अवमान करणे आणि इतरांवर शाब्दीक टिका करणे इतकेच सुरू आहे. अदानी प्रकरणात मोदी सरकार अडचणीत आले आहे. जनतेच्याही लक्षात सर्वकाही येऊ लागल्यामुळे लोकशाही मोडीत काढण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. राहूल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे हुकुमशाहीकडे अधिकृतरित्या पडलेले हे पहिले पाऊल असून देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आता जनतेलाच एकत्र यावे लागेल आणि सर्वांनी एकत्र यायला हवे आणि भाजपला सत्तेतून हद्दपार करायलाच हवे, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले आहे.