लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोमध्ये पुतळा; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

0
930

पिंपरी दि. ८ (पीसीबी) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये उभारण्यात आले असून त्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.

महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कतृत्वाचा आणि भारत रशिया संबधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण 14 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्रात करण्याचे योजिले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे तसेच प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री नारायणस्वामी व महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त अण्णाभाऊंच्या विचाराने प्रेरित सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत, असे गोरखे यांनी सांगितले.