लोकशाहीमूल्यांची जपवणूक करणे हे साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य – प्रा. फ. मुं. शिंदे

0
236

पिंपरी दि. २९(पीसीबी) – लोकशाही लोकांसाठी असली तरी आपल्या देशात ती फक्त शाही लोकांसाठी आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकशाहीमूल्यांची जपवणूक करणे हे साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.

शब्दधन काव्यमंच आणि मानवी हक्क व जागृती संरक्षण या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचाहत्तर कवींनी ‘जागर स्वातंत्र्याचा’ या ऐतिहासिक कविसंमेलनात आपल्या काव्याच्या समिधा अर्पण केल्या. रविवारी (दि.28) रोजी पिंपळे गुरव येथील 8 ते 80 आझादी का अमृत महोत्सव या उद्यानात प्रत्यक्षात आठ ते ऐंशी वयोगटातील कवींनी केलेल्या काव्यजागरात प्रा. फ. मुं. शिंदे, प्रा. लीला शिंदे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे, ज्येष्ठ कवी धनंजय सोलंकर, पुरुषोत्तम सदाफुले, श्रीकांत चौगुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क व जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय नौसेनेतील सेवानिवृत्त अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या हस्ते तिरंगापूजन करून काव्यसोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बालसाहित्यिका प्रा. लीला शिंदे यांनी आपल्या मनोगतातून, “ऐनदुपारी, भर उन्हात ‘जागर स्वातंत्र्याचा’ या कविसंमेलनातील कवींची एवढी मोठी उपस्थिती अन् प्रखर काव्यनिष्ठा पाहून मन आनंदाने भरून आले आहे!” या शब्दांत भावना व्यक्त केल्या.

प्रा. फ. मुं. शिंदे यांनी आपल्या तीन मार्मिक कवितांचे सादरीकरण करून वास्तवावर भाष्य करीत उपस्थितांना अंतर्मुख केले. मल्लिकार्जुन इंगळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कविसंमेलनातील पंचवीस, पन्नास आणि पंचाहत्तर या क्रमांकांवरील कवींना शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले; तर सहभागी प्रत्येक कवीचे तिरंगी कापडी प्रतिमा गळ्यात घालून आणि प्रमाणपत्र प्रदान करून स्वागत करण्यात आले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश घोरपडे, अण्णा गुरव, मधुश्री ओव्हाळ, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि ‘वंदे मातरम्’ने समारोप करण्यात आला.