दि . ११ ( पीसीबी ) – 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. गेल्या 8 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीला काल (दि.10 मे) संध्याकाळी अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्याला भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा करत दुजोरा दिला आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केले. युद्धामध्ये कोण जिंकले ? कोण हरले ? कोणाचे किती नुकसान झाले ? याबद्दलचा उहापोह आता सुरु होईल. मात्र मागील आठ दिवसात विविध प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या विश्वासाहर्ते बद्दल गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तद्दन खोट्या, अतिरंजित व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. युद्धा सारख्या गंभीर आणि मानवी जीवाशी निगडित विषयासंबंधित वार्तांकन करताना प्रसार माध्यमांची बेजबाबदारपणा व बेफिकिरी पाहता लोकशाहीचा आणखीन एक स्तंभ ढासळल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे.
युद्धातील निर्णायक शस्त्र
कोणत्याही युद्धामध्ये माहितीचे महत्त्व अनमोल असते. ती सत्य असो वा असत्य, तिची भूमिका निर्णायक ठरते. महाभारत काळापासून ते अगदी आधुनिक युद्धांपर्यंत, अनेक युद्धे केवळ माहितीच्या प्रसारामुळे जिंकली किंवा गमवावी लागली आहेत. योग्य वेळी योग्य माहितीचा पुरवठा जसा सैनिकांचे मनोबल वाढवतो, त्याचप्रमाणे चुकीच्या माहितीचा प्रभावी वापर शत्रूच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करू शकतो. युद्धाच्या धगधगत्या आणि तणावपूर्ण वातावरणात, ‘धोरणात्मक चुकीच्या माहिती’चा वापर एक अत्यंत प्रभावी मानसिक शस्त्र म्हणून यापूर्वी केला गेला आहे. शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करणे, त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकणे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देणे हे या तंत्राचे प्रमुख उद्देश असतात. या प्रकारच्या वृत्तांकनामुळे शत्रूची रणनीती विस्कळीत होऊ शकते. महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांच्या पराभवासाठी ‘अश्वत्थामा मारला गेला’ या वृत्ताचा खुबीने वापर करण्यात आला होता. हे धोरणात्मकदृष्ट्या पसरवलेले असत्य वृत्त द्रोणाचार्यांच्या मानसिकतेवर आघात करून त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडले. या एका घटनेने युद्धाचे पारडे फिरवले. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी या रणनीतीचा उत्कृष्ट वापर केला होता. जेव्हा बलाढ्य अफजल खान आपल्या विशाल सैन्यासह स्वराज्यावर चाल करून आला, तेव्हा महाराजांनी त्याला धोरणात्मकरीत्या चुकीची माहिती पुरवली. त्यांनी अफजल खानाला असे भासवले, की ते त्याच्या सामर्थ्यापुढे नमले आहेत आणि त्याला घाबरले आहेत. यामुळे अफजल खान गाफील राहिला आणि त्याने महाराजांच्या भेटीच्या आमंत्रणाला सहजपणे स्वीकारले. याच संधीचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या कौशल्याने अफजल खानाचा वध केला आणि स्वराज्याचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे, आधुनिक युद्धांमध्येही शत्रूंना चुकीच्या बातम्या देऊन त्यांच्या हालचालींवर आणि मनोधैर्यावर परिणाम साधण्याचे प्रयत्न केले जातात. अशा उद्देशाने भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल काही चुकीची माहिती पसरवून पाकिस्तानी सैन्याचे व त्यांच्या नागरिकांचे मनोबल खच्ची करण्यासाठी काही चुकीची माहिती पसरवली गेली, तर त्यात काहीच गैर नाही. परंतु मागील आठ दिवसांत भारतीय प्रसारमाध्यमांनी युद्धाच्या वृत्तांकनाच्या नावाखाली मांडलेला तमाशा पाहून हसावे की रडावे तेच कळत नाही.
युद्ध वार्तांकनातील फोलपणा
मात्र, मागील आठवड्यात भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल केलेल्या वृत्तांकनामुळे भारतीय प्रसारमाध्यमे आता आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर थट्टेचा विषय बनली आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युबसारख्या समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांची अक्षरशः खिल्ली उडवली जात आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या खाईत होरपळत असताना माध्यमांची भूमिका एका निष्पक्ष आधारस्तंभाप्रमाणे असणे अपेक्षित होते. परंतु, अनेक स्वयंघोषित प्रतिष्ठित माध्यमांनी सत्यनिष्ठ पत्रकारितेचा मार्ग सोडला आणि खळबळजनक बातम्या देणे, दिशाभूल करणारी माहिती पसरवणे, तसेच लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेणे, युद्ध एका तमाशाप्रमाणे सादर करण्यात ते रमले होते. “सबसे तेज”, “बिग ब्रेकिंग न्यूज”, “बडी खबर”, “ग्राऊंड रिपोर्ट” अशा बातम्या देण्याच्या नादात म्हणा किंवा स्पर्धेत म्हणा, अनेक माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या, अतिरंजित दावे किंवा पूर्णपणे काल्पनिक घटना लोकांपर्यंत पोहोचविल्या. बहुतांश भारतीय प्रसार माध्यमांनी युद्धाला एका मोठ्या, चित्तथरारक मनोरंजनासारखे रंगवून दाखवण्यात धन्यता मानली. बातम्या देणारे निवेदक मोठ्या सायरन वाजवून भीतीदायक आवाजात नाट्यमय मथळे वाचत होते, युद्धाच्या दृश्यांची मांडणी एखाद्या थरारक चित्रपटाच्या ट्रेलरसारखी केली जात होती. प्रसार माध्यमांच्या बेजबाबदार वृत्तांकनामुळे राष्ट्रीय हितांवर अनपेक्षित आणि प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रसार माध्यमांच्या बेजबाबदार वृत्तांकनाचा तमाशा पाहता, भारत सरकारने माध्यमांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज आणि रिअल-टाइम रिपोर्टिंग करणे, तसेच संवेदनशील माहिती उघड करणे टाळण्याची विनंती करण्यात आली आहे. कारण या गोष्टींमुळे सैन्य करत असलेल्या कार्यवाहीच्या प्रभावीतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि सैनिकांचे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांनी युद्धासारख्या मानवी संकटाचे व्यापारीकरणच केले, हे अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक आहे.
बोगस बातम्या आणि विचारशून्य प्रतिक्रिया
प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या बोगस बातम्यांवर विश्वास ठेवून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर त्वरित अतिरंजितपणे नोंदविल्या. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब यांसारखी समाजमाध्यमे आता भारतातील घराघरात पोहोचली आहेत. त्यामुळे खोट्या, काल्पनिक, खातरजमा न केलेल्या व अतिरंजित बातम्यांवरील आधारित प्रतिक्रिया आता घराघरात चर्चेचा विषय बनल्या आहेत. काही जागरूक नागरिकांनी या चुकीच्या बातम्यांचे खंडन करण्याचा आणि लोकांना सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने, ज्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना अनेकदा देशद्रोही किंवा मूर्ख ठरवून त्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले गेले. हे सर्व अत्यंत धोकादायक आहे, कारण प्रसारमाध्यमांच्या अशा वृत्तांकनामुळे समाजाची सखोल विचार करण्याची सवय हळूहळू कमी झाली आहे. कोणतीही बातमी ऐकल्यावर तिची सत्यता पडताळून पाहण्याची किंवा तिच्या सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय परिणामांसारख्या विविध पैलूंचा विचार करण्याची समाजाची क्षमता क्षीण झाली आहे. ज्यामुळे त्याबद्दल असलेली समाजाची प्रतिक्रिया तात्कालिक, उथळ, विचारशून्य आणि अतिरंजित भावनांवर आधारित होऊ लागली आहे. भारतासारख्या मोठ्या देशात अफवा पसरवणे अथवा भावना भडकवणे किती सोपे झाले आहे याचे प्रदर्शनच जगापुढे झाले आहे, हे खूप भयावह व धोकादायक आहे.
लोकशाहीचे आधारस्तंभ आणि जनतेचा विश्वास
कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे हे कोणत्याही सशक्त लोकशाहीचे चार महत्त्वपूर्ण आधारस्तंभ मानले जातात. हे स्तंभ एकत्रितपणे लोकशाही मूल्यांचे संरक्षण करतात आणि नागरिकांच्या आकांक्षांना मूर्त स्वरूप देतात. कायदेमंडळाबद्दल, म्हणजेच जनतेने निवडणुकीद्वारे निवडलेले लोकप्रतिनिधी, यांच्याबद्दल आज केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर संपूर्ण देश पातळीवर एक मोठी अनास्था निर्माण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला भ्रष्टाचार, परिवारवाद आणि लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थाला अधिक महत्त्व देतात अशी भावना समाजात आहे. निवडणुकीत ‘मनी आणि मसल पॉवर’ चा वापर सर्रासपणे होत असल्याने सामान्य माणसाचा प्रामाणिक लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला आहे, तसेच सामान्य कार्यकर्त्याला देखील आपण लोकप्रतिनिधी होऊ शकतो हा विश्वास नसल्याने काही प्रमाणात तो आता व्यावसायिकपणे वागू लागला आहे. दुसरीकडे, कार्यकारी मंडळ, म्हणजेच प्रशासकीय यंत्रणा आणि नोकरशाही यांच्याबद्दलही समाजात तीव्र नाराजी आहे. शासकीय कामांमध्ये होणारा अनावश्यक विलंब, सर्व स्तरांवर पसरलेला भ्रष्टाचार आणि छोट्या-मोठ्या कामात सामान्य नागरिकांची होणारी हेळसांड यामुळे लोकांचा प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका, जी न्याय आणि कायद्याचे राज्य स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे, तिच्याबद्दलही सामान्य जनतेच्या मनात निराशा आहे. “तारीख पे तारीख” मुळे न्याय मिळवण्यासाठी लागणारा प्रचंड वेळ आणि त्यासाठी येणारा व न पेलवणारा खर्च यामुळे सामान्य माणूस न्यायाच्या दारापर्यंत पोहोचायलाही कचरतो. वेळेवर न्याय मिळत नसल्याने अनेकदा अन्याय सहन करावा लागतो. या सर्व बाबींमुळे समाजात न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे.
माध्यमांची ढासळती विश्वासार्हता
लोकशाहीचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे माध्यमे. जनतेला सत्य आणि निष्पक्ष बातम्या पुरवण्याची आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची मोठी जबाबदारी माध्यमांवर असते. परंतु, मागील आठवड्यात भारत-पाकिस्तान युद्धाच्या बाबतीत काही माध्यमांनी ज्या प्रकारे बेजबाबदार आणि अतिरंजित वृत्तांकन केले, ते पाहता हा स्तंभही आता डगमगला आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमांनी आज आपली विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात गमावली आहे. मागील आठ दिवसांतील त्यांच्या वृत्तांकनाकडे पाहता प्रसार माध्यमांनी वेळीच स्वतःला आवर घालायला हवा. आपल्या ज्येष्ठांनी अत्यंत सचोटीने मिळवलेली विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी टीआरपी आणि ‘सबसे तेज’च्या स्पर्धेत न पडता सत्याचा मार्ग स्वीकारायला हवा. प्रसारमाध्यमांचे बाजारीकरण थांबवून देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडायला हवे, ही समाजाची प्रामाणिक अपेक्षा आहे. वृत्तांकनातील सनसनाटीपणा आणि नाटकीपणा बंद करून माध्यमांनी जबाबदारीने आपली भूमिका बजावणे ही काळाची गरज आहे.
लोकशाहीची जबाबदारी
एका सुदृढ आणि सशक्त लोकशाहीची केवळ कल्पना करून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षात जपण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी केवळ कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या संस्थांवरच नाही, तर या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकावर आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या नागरिकांच्या सक्रिय आणि जागरूक सहभागाशिवाय ती अधिक सक्षम होऊ शकत नाही. आज माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे, विविध प्रसारमाध्यमे बातम्या आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही बातमीवर त्वरित आणि अंधविश्वास ठेवण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या युगात कोणतीही बातमी खरी आहे की खोटी, याची खातरजमा करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. विविध “फँक्ट चेकिंग” संकेतस्थळे आणि साधने आता मोबाईलद्वारे आपल्या हातात उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने आपण प्रसारित झालेल्या माहितीची सत्यता पडताळू शकतो. त्यामुळे, कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी, तिची सत्यता आणि विश्वसनीयता तपासणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या बेजबाबदार प्रतिक्रियांमुळे समाजात गैरसमज आणि अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यापूर्वी शांतपणे विचार करणे, योग्य माहिती मिळवणे आणि मगच आपले मत व्यक्त करणे अधिक महत्त्वाचे आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या विचारांना आणि भावनांना संयमाने व्यक्त केले पाहिजे, जेणेकरून आपल्या कृतीतून लोकशाही मूल्यांचे जतन होईल.