दि . १६ ( पीसीबी ) – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचं पुण्यात निधन झालं. आज, १६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि अल्पशा आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरातील शैक्षणिक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत केसरी वाडा, टिळक रोड येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमींनी या ठिकाणी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहण्याची शक्यता आहे.
डॉ. दीपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या सेवेसाठी समर्पित होतं. ‘केसरी’ वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Dr. Deepak Tilak Passed Away)
२०२१ मध्ये जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याची दखल घेत जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. याशिवाय ते अनेक संस्थांचे विश्वस्त राहिले होते आणि नव्या पिढीला जागृत करणारा एक विचारवंत म्हणून ओळखले जात होते.
डॉ. टिळक यांच्या निधनावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती, लोकशिक्षण व मूल्याधिष्ठित विचारांचा प्रचार केला,” असे पवार यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले.
“डॉ. टिळक हे एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे,” अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी टिळक कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही नमूद केले.