कार्यकर्त्यांना प्रेरणा, ऊर्जा देणारे ”शक्तीस्थळ’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थतित लोकार्पित
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी
आमदार शंकर जगताप यांच्याकडून लक्ष्मणभाऊंच्या कार्याला मानवंदना
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्ते गहिवरले!
पिंपरी, दि. 1: पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या चिरस्थायी कार्याची आठवण देणारे, तमाम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण आज करण्यात आले. हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गुरुवारी (दि 1) म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराला विकासाचा ठोस चेहरा देत सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले. औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार आणि महापालिकेचा समन्वय साधत विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन प्रत्यक्षात उतरवले. त्यांची कारकीर्द, विकासातील योगदान कायम स्मरणात राहील असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याचा आढावा देणारा आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचे केंद्र ठरणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण पिंपळेगुरव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार अश्विनी जगताप, चंद्रकांत मोकाटे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार विलास लांडे, उद्योजक उमेश चांदगुडे, माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे, ऐश्वर्या रेणुसे, चंद्ररंग डेव्हलपर्सचे विजय जगताप तसेच जगताप कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्तेही गहिवरलेले पहायला मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले,आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. यापुढील काळात लक्ष्मणभाऊंनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर आज पूर्णत्वाला आणले जात आहे. त्यांच्या स्वप्नातील शहराचा विकास आराखडा आपल्याला अस्तित्वात आणायचा आहे. ते केवळ निवडणुका नव्हे तर मन जिंकणारे नेते होते. त्यांच्या आठवणी कायम चिरकाल हृदयात आहेत आजचे हे शक्ती स्थळ त्यांच्या प्रेरणेची ऊर्जा देणारे केंद्र ठरेल. लक्ष्मणभाऊ म्हणजे शेती, मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. कोणताही मोठा राजकीय वारसा त्यांच्या जवळ नव्हता. मात्र स्वतःच्या हिमतीवर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि मागे वळून कधी पाहिलेच नाही. येथील नदीत नाव उलटण्याचे निमित्त झाले आणि या शहराला सर्वंकष असे नेतृत्व लक्ष्मणभाऊंच्या रूपात मिळाले. असे अपघात पुन्हा आपल्या शहरात व्हायला नको. आपले शहर विकासाच्या वेगाने धावले पाहिजे. हा एकच विश्वास आणि हीच जिद्द काय मनात ठेवून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी, शहर अत्याधुनिक करण्यासाठी जे जे हवे ते ते या शहरांमध्ये आणले. युवा अवस्थेत राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून आले. तब्बल 21 वर्षे या पदावर कायम राहत केवळ समाजकारण करत राहिले. माणसे जोडत गेले म्हणूनच त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. ते चार वेळा आमदार राहिले. या कालावधीत शहराला विकासाच्या वेगाशी जोडले.
पिंपरी चिंचवड शहराला चेहरा देण्याचे काम लक्ष्मणभाऊंनी केले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून मोठी प्रगती झाली. अनेक कारखान्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या शहरामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत होती. एक प्रकारे मिनी महाराष्ट्र म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख होत असताना या शहराला विकासाचा नवा आयाम देण्याचे काम लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून झाले. पिंपरी चिंचवडमधील त्यांची कारकीर्द, त्यांचे विकासातील योगदान कोणीही विसरू शकत नाही. आमदार म्हणून शहराच्या विकासाच्या दृष्टीने ते कायम संघर्ष करत राहिले. अत्याधुनिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख होताना लक्ष्मणभाऊंचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महापालिका या दोघांचा मेळ घालत लक्ष्मणभाऊंनी या शहराला चेहरा देण्याचे काम केले. विकासाचे व्हिजन खऱ्या अर्थाने लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहरात रुजवले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे आध्यात्मिक बैठक होती. वारकरी संप्रदायाशी त्यांचे घट्ट नाते होते. मातीशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. उत्तम खेळाडू, सांघिक नेतृत्व या माध्यमातून त्यांचे काम होते. ते उत्तम घोडेस्वार होते. त्यामुळेच विकासाचा वेग त्यांनी कायम राखला. शहर विकासाच्या अत्याधुनिक कल्पना त्यांच्या ठायी वसलेल्या होत्या. त्यामुळेच आज या शहराचे पालटलेले रूप आपण पाहतो. कचऱ्यापासून वीज निर्मिती, 24 x 7 पाण्यासाठी अमृत योजना, नदी सुधार योजना अशा सर्व योजना चिरकाल लक्ष्मणभाऊंच्या कार्याची आठवण देत राहतील. लक्ष्मणभाऊ लढवय्ये होते. विपरीत परिस्थितीतही ते नेहमी विजयी होत होते. त्यांच्या उभ्या आयुष्यात कुठल्याही परीक्षेत त्यांचा पराजय झालेला आपण पाहिला नाही मात्र नियतीने त्यांना हरवले. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
*भाऊंकडून मुख्यमंत्री म्हणून उल्लेख आणि शपथविधी!
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांना काळाच्या पलीकडे पाहण्याची सवय होती. विधान परिषदेच्या निवडणुकीचा तो क्षण मी विसरू शकत नाही. अटीतटीची परिस्थिती होती. आमदार म्हणून त्यांचे मत महत्वाचे होते. आमदार शंकर जगताप यांना मी फोन केला. पक्षाला गरज आहे मात्र लक्ष्मण भाऊंची शारीरिक परिस्थिती असेल तरच त्यांना मतदानाला आणा असा निरोप दिला. भाऊंच्या कानावर ही गोष्ट पोहोचली. तेव्हा त्यांनी पक्ष प्रथम असे म्हणत मी मतदानाला जाणारच असे सांगितले. कार्डियाक ॲम्बुलन्समधून येत त्यांनी मतदान केले. त्यामुळे मला त्यांनी मुख्यमंत्री साहेब म्हणून हाक मारली.त्यानंतर 15 ते 20 दिवसातच सत्ता बदल झाला. मी मुख्यमंत्री झालो अशी आठवणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अकाली निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. जसे जगताप कुटुंबीयांनी सर्वस्व गमावले होते. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी भक्कम पाठीराख्याला गमावले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहत खंबीरपणे साथ दिली. पिंपरी चिंचवडकरांना चांगल्या सुविधा देऊन त्यांना अत्याधुनिक शहरात राहण्याचे स्वप्न भाऊंनी दाखवले. त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची मी ग्वाही देतो. आजलोकार्पण झालेले शक्तीस्थळ कायम ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. लक्ष्मणभाऊंच्या आदर्शावर कायम चालत राहण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे.
शंकर जगताप
आमदार , पिंपरी चिंचवड शहर.














































