लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका

0
183

पुणे, दि.२४ (पीसीबी) : लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारून कारवाई करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खडीमशीन रोड, वडमुखवाडी येथील सनशाईन लॉज येथे करण्यात आली. पोलिसांनी लॉज मालकाला अटक केली आहे.

नितीन रावसाहेब कोकरे (वय 28, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक केलेल्या लॉज मालकाचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार मारुती करचुंडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील खडीमशीन रोडवर सनशाईन लॉज मध्ये एक व्यक्ती लॉजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता.

त्यानुसार पोलिसांनी सनशाईन लॉजवर मंगळवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये लॉज मालक नितीन कोकरे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन हजार 90 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपी नितीन कोकरे हा वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली.