लेखनरंग गुलुगुलु बोलू व बडबडगीतांच्या अल्बमचे प्रकाशन

0
261

– स्वअभिव्यक्तीतून स्त्री घडत जाते !” – डॉ. संगीता बर्वे

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) “अध्यात्माचे अंधानुकरण आणि परंपरेच्या बेड्या झुगारून लेखन, कलासर्जन यासारख्या स्वअभिव्यक्तीतून स्त्री घडत जाते अन् प्रगतिपथावर चालू लागते!” असे विचार भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी ब्रह्मचैतन्य हॉल, बिजलीनगर, चिंचवड येथे रविवार, दिनांक १० जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. स्वानंद महिला संस्था आणि श्री आनंद मंगल साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. सुरेखा कटारिया आणि डॉ. श्वेता राठोड या मायलेकींच्या ‘लेखनरंग गुलुगुलु बोलू’ या पुस्तकाचे आणि ‘ढिंग चॅंग आनंदी आनंद’ या बालगीतांच्या अल्बमचे प्रकाशन करताना डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या. किशोर बालभारती (पुणे)चे संपादक किरण केंद्रे, ज्ञानप्रबोधिनी (निगडी)चे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, प्रा. राजेंद्र सोनवणे, स्वानंदच्या अध्यक्षा सुनीता बोरा, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नवयुग साहित्य संस्था अध्यक्ष राज अहेरराव अध्यक्ष, व्याख्याते राजेंद्र घावटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी किरण केंद्रे म्हणाले की, “तंत्रज्ञानामुळे लहान मुले अतिशय बुद्धिमान झाली असली तरी त्यांच्या भावविश्वाशी समरस होत प्रा. सुरेखा कटारिया आणि डॉ. श्वेता राठोड यांनी बालसाहित्यात अन् संगीतात केलेले अभिनव प्रयोग स्तुत्य आहेत. एक कविता किंवा कथा मुलांचे आयुष्य बदलू शकते!” मनोज देवळेकर यांनी, “विषयांच्या भिंतींमुळे सर्जनशीलता हरवत चालली आहे!” अशी खंत व्यक्त केली; तर श्रीकांत चौगुले यांनी, “मौखिक परंपरेमुळे बालसाहित्य हजारो वर्षे टिकून आहे. ‘लेखनरंग गुलुगुलु’ आणि ‘ढिंग चॅंग आनंदी आनंद’ या साहित्य-कलाकृती सहजता, सोपेपणा अन् आशयसंपन्नता हे बालसाहित्याचे निकष पूर्ण करणाऱ्या आहेत!” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी प्रा. सुरेखा कटारिया यांनी आपल्या मनोगतातून, “साहित्यक्षेत्रात वावरताना प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती भेटत गेल्याने माझी अभिव्यक्ती समृद्ध होत गेली. बालकविता, बालकथा, नाट्यछटा, पत्रलेखन, अनुभवकथन, बालगीते यांच्या निर्मितीत कन्या, नातवंडे यांच्यासह पुन्हा बालपण अनुभवता आले; याशिवाय या आनंदात स्वानंद सख्यांना सहभागी करून आनंद द्विगुणित करता आला!” अशा भावना व्यक्त केल्या. निमांश कटारिया आणि आनंद राठोड या छोट्या बालचमुनी अनुक्रमे सादर केलेले गणेश बालगीत अन् पियानोवरील पंचपदी तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि नवकार महामंत्राचे पठण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने पुस्तकाचे तर डिजिटल माध्यमातून अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. प्रकाश कटारिया, प्रदीप गांधलीकर, कल्पना कर्नावट, साधना सवाणे, सुनीता लुणावत, सुभाषचंद्र जैन, सुजाता नवले यांनी संयोजनात सहकार्य केले. डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. स्वानंदच्या अध्यक्षा सुनीता बोरा यांनी प्रास्ताविक केले. कल्पना कर्नावट यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.