लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

0
312

मोशी येथे पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व साहित्यिक अरुण बोऱ्हाडे

पिंपरी, पुणे (दि.२४ डिसेंबर २०२२) समाजाला साहित्याची, प्रबोधनाची, मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिले पाहिजे. ज्या लेखनात साहित्यात समाज हित सामावलेले असते तेच खरे साहित्य होय आणि आज त्याचीच खरी गरज आहे. लेखक हा संवेदनशील असला पाहिजे. समाजाच्या संवेदना भावभावना त्याच्या लेखणीतून व्यक्त झाल्या पाहिजेत. लेखकाने एखाद्या प्रश्नावर “भूमिका” घेतली पाहिजे, ही परंपरा श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून सुरू आहे, परंतु आज ही परंपरा पाळली जात नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मोशी येथे व्यक्त केले.

इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठावर यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, स्वागत अध्यक्ष संतोष बारणे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, हभप बाळासाहेब महाराज काशीद, कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, देहु देवस्थानचे मोरे महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष भाषनात अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले की, श्री संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, नागेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेल्या मोशी गावात इंद्रायणी साहित्य परिषदेचे पहिले इंद्रायणी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शेतकरी, कष्टकरी कामगार यांच्या त्यागातून आणि कष्टातून या पंचक्रोशीचे आज स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटी म्हणून जागतिक पातळीवर नाव झाले आहे. जागतिकीकरणाच्या या परिस्थितीत देखील मोशी गाव आणि ग्रामस्थ अजूनही आपले गावपण, वारकरी सांप्रदायाची परंपरा आणि सामाजिक भान टिकवून आहेत. शहराला मिळालेला हा नावलौकिक म्हणजे येथील शेतकऱ्यांनी, कामगारांनी समर्पण भावनेने केलेल्या त्यागाची फलनिष्पत्ती आहे. मी माझ्या मनातील भाव, भाषा भोवतालचे चित्रीकरण “भाव,भाषा आणि भवताल” यामध्ये शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी मधील हिंदुस्तान एंटीबायोटिकच्या माध्यमातून कामगार चळवळीतून मी कामगार व समाजकारणाशी जोडले गेलो. पण कालांतराने पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने माझाओढा साहित्यिक क्षेत्राकडे वाढत गेला. रवींद्रनाथ टागोर साने गुरुजी यांच्यापासून अनेक नवीन लेखकांपर्यंत मी साहित्य वाचन करत राहिलो यातूनच माझे व्यक्तिमत्व घडत गेले मोशी गावात गेल्या अनेक वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याची ही परंपरा आहे त्यामुळे येथील प्रत्येक घराघरात संघटन आहे. “माझ्या गावाची रे माती, साधु संतांची वसती | जरी इथे बारा जाती, बंधू भावाने नांदती | अशी ही मी चोवीस वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आजही तेच सांगत आहे. माय माझी इंद्रायणी, जन्म तिच्या कुशीतला, कानी माझ्या संतवाणी आत्मा इथे सुकवला | लहानपणी आजीच्या बोटाला धरून एकादशीला आळंदीला जाणे माऊलींच्या समाधीवर माता टेकवणे कीर्तन ऐकणे या आनंद सोहळ्यातच मी घडत गेलो. माझ्या गावाला नाथ संप्रदायातील महान साधू श्री नागेश्वर महाराजांची पुण्याई लाभलेली आहे.

संत ज्ञानदेवांपासून एकनाथ, नामदेव, जनाबाई मुक्ताई, संत सावतामाळी, गोरा कुंभार, चोखोबा आदी सर्व संत परंपरेतील कोणाही संतांचा कोणताही शब्द अज्ञान, अहंकार अंधश्रद्धा या सर्वांपासून आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातो. संतांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानदिष्टीत आहे माणुसकीला व्यवहाराची, अध्यात्माची नीतीशास्त्राची आणि सुधारणावादाची जोड देणारे, जगण्याला आधार देणारे साहित्य या संतांनी निर्माण केले आहे. या संत साहित्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. जगण्याचे सामर्थ्य देणारी शब्दरचना माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये तुकोबांच्या अभंगांमध्ये आणि इतर सकल संतांच्या शब्दरचनेमध्ये देखील दिसून येते.

महाराष्ट्र ही सुधारणावादी समाजसुधारकांची भूमी आहे. महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समतेची, मानवतेची, बंधुत्वाची शिकवण समाजाला दिली. ज्ञानाचा प्रकाश सर्व दूर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, साने गुरुजी यांनी विचारांचे शिंपण करून महाराष्ट्राचे समाजमन घडविले आहे. त्याच्या अगोदर अनेक वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी गुलामगिरी, अन्याय, अत्याचाराविरुद्ध या महाराष्ट्राच्या भूमीवरती पहिले निशाण उभे केले. सह्याद्रीच्या दऱ्या, खोऱ्यात डोंगर, कपारीत राहिलेल्या मावळ्यांना बरोबर घेत त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा अविष्कार नव्हता होता तर मानवतेच्या आत्मजागृतीचा, मानवतेच्या स्वाभिमानाचा, मानवतेच्या उत्कर्षाचा अविष्कार होता. राजमाता जिजाऊंनी त्यांना दिलेली शिकवण ही सकल जनांच्या उद्धारासाठी, सकल जनांच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली आणि छत्रपती शिवरायांनी जीवाची बाजी लावून ती प्रत्यक्ष आणली. सर्वांना बरोबरी घेऊन जाणारे रयतेचे राज्य त्यांनी निर्माण केले. राजा कसा असावा प्रजा कशी असावी, स्वाभिमान कसा असावा, कर्तुत्व कशी असावी हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिले. स्वराज्य विषयी अनेक गोष्टी सांगता येतील त्यांनी राज्याभिषेकानंतर सर्वात मोठी देणगी दिली म्हणजे मायबोली मराठीच्या गौरवासाठी आणि सामान्य जनतेच्या सोयीसाठी छत्रपतींनी सुरू केलेला “राज्य व्यवहार कोश” त्यांनी निर्माण केलेली स्वराज्याची मुद्रा अर्थात “शिवराय होन” निर्माण केले. स्वराज्य तोरण दारी, शिवशक सुरू केले.

 

युगप्रवर्तक राजे, शिवराय छत्रपती झाले | स्वराज्य चलन हाती, शिवराई होन केले, रयतेच्या राज्यासाठी शिवराय छत्रपती झाले.

सध्या मात्र शेतकरी, कष्टकरी, कामगार, कंत्राटी कामगार यांना पायाखाली चिरडून देश चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश गुलामगिरीरीकडे चालला आहे काय ? असा प्रश्न आता पडत आहे. वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार याविषयी कोणाला भय नाही. शिक्षणामध्ये पटसंख्या कमी झाली तरी शाळा बंद केली जाते. दऱ्या, खोऱ्यातील, डोंगर कपारातील शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचे नाही काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. “आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा” या नावाखाली पालक कर्ज काढून मुलांना प्राथमिक शाळेत पाठवत आहेत. शिक्षण कुठे चालले आहे. देशावर ,राष्ट्रावर प्रेम आता कमी होत आहे . प्रगती झाली पाहिजे पण सत्याचा मार्ग पाहिजे. अधिकारी देखील लोकप्रतिनिधींना घाबरत नाहीत. कामगार शेतकरी देशदडीला लागला आहे ग्रामीण गरीब श्रीमंतातील दरी वाढत आहे. आता ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी लेखक आणि साहित्यिकांवरच आली आहे पुढील पिढी जर सक्षम आणि सुसंस्कृत घडवायची असेल तर आता शिक्षक लेखक साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

उद्घाटनापूर्वी श्री नागेश्वर महाराज मंदिर पासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी करण्यात आली या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी बरोबरच संत तुकाराम महाराजांची गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चा ग्रंथ, गाथा महात्मा फुले समग्र वांग्मय, ग्रामगीता, संविधान ठेवण्यात आले होते.

स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. आभार कार्यकारणी मंडळाचे कार्यध्यक्ष सोपान खुडे यांनी मानले. या संमेलनाच्या आयोजनामध्ये मोशी ग्रामस्थांसह इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे, सहसचिव डॉ. ए. ए. मुलानी, कोषाध्यक्ष अलंकार हिंगे, सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव यांनी सहभाग घेतला.