पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – सात जणांनी मिळून हरगुडे वस्ती येथे राहणा-या एका महिलेचा खून केला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.अल्लाउद्दीन सिराजुद्दीन राईन (वय 29, रा. ओटास्किम निगडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी मोहम्मद मोनीष इसरार अहमद शेख (वय 25, रा. देहूरोड), वासीब उर्फ टोनू मोनू रईस खान (वय 22, रा. देहूगाव), अब्दुल मुनाफ अब्दुल मलिक अन्सारी (वय 24, रा. रुपीनगर, तळवडे), रईसउद्दीन सुलतान अहमद राईन (वय 40, रा. मोरेवस्ती, चिखली) या चौघांना अटक केली आहे. मोहम्मद अकील राईन (रा. मोरेवस्ती, चिखली), जरीश राईन (रा. मोरेवस्ती, चिखली) हे दोघे अद्याप फरार आहेत.
कमल बाबुराव खानेकर उर्फ नूरजहाँ अजीज कुरेशी (वय 56, रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2021 रोजी हरगुडे वस्ती येथे एका महिलेचे हात, पाय बांधून तोंडाला चिकटटेप लावून गळा दाबून खून केल्याची घटना घडली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील चौघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली होती. त्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार होता. हा आरोपी गुरुवारी (दि. 28) आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड येथे येणार असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली.
गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून पोलिसांनी आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सापळा लावला. तब्बल सात तास हा सापळा लावून रात्री सव्वादहा वाजता आरोपीला पोलिसांनी एका लहान खोलीतून अटक केली. महिलेच्या अंगावर भरपूर दागिने असतात. ती जमीन खरेदी-विक्रीही करते म्हणजे तिच्याकडे भरपूर पैसे देखील असतील. त्यात ती एकटी राहते. त्यामुळे एक गेम केला कि आयुष्य सेट होईल, या समीकरणातून महिलेचा खून करण्यात आला होता.












































