लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची संशयावरून हत्या

0
105

मृतदेह खंबाटकी घाटात फेकला

महिलेच्या तीन वर्षीय मुलाला सोडले आळंदीत

वाकड, दि. 28 (पीसीबी) : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणा-या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिले. महिलेच्या तीन वर्षीय मुलाला आळंदी येथे सोडून देत प्रियकराने स्वतः महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर वाकड पोलिसांनी तक्रार देणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे.

दिनेश पोपट ठोंबरे (वय 32, रा. मु बहुर, पो. करूंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. जयश्री विनय मोरे (वय 27, रा. मारूंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी प्रेयसी जयश्री विनय मोरे जिंजर हॉटेल, भमकर चौक, वाकड येथून काही न सांगता निघून गेली ती परत आली नसल्याची तक्रार दिनेश ठोंबरे याने वाकड पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांना जयश्री मोरे यांचा मृतदेह खंबाटकी घाट (खंडाळा) जि. सातारा येथे आढळून आला. याबाबत सातारा पोलिसांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दिनेश ठोंबरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

दिनेश आणि जयश्री हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान दिनेश याला जयश्री हीचे दुसऱ्या पुरुषा बरोबर सबंध असल्याचा संशय होता. तसेच तिने दिनेश यास पैशाची मागणी केल्याने दिनेश याने 24 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जिंजर हॉटेल सर्व्हिस रोड, भुमकर चौक परिसरात तिच्याशी भांडणे केली. त्यावेळी त्याने कारमधील हातोडी जयश्री मोरे हिच्या डोक्यात मारुन तिचा खून केला. तिचे प्रेत सातारा हायवेने कारमधून नेऊन खंबाटकी घाट (खंडाळा) जि सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले.

जयश्री मोरे हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. दिनेश याने मुलाला आळंदी येथे सोडून दिले. त्यानंतर स्वतः वाकड पोलीस ठाण्यात जाऊन जयश्री मोरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र त्याचा बनाव अवघ्या 12 तासात उघडकीस आला. पोलिसांनी दिनेशला अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशीकांत महानवर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांनी केली आहे.