‘लिव्ह इन’मध्ये होतोय घात, वाढत्या प्रकारांमुळे पोलीस यंत्रणाही हैराण

0
37

पिंपरी, दि. 05 (पीसीबी) : विवाह संस्कृतीला फाटा देत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये एकत्रित राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मात्र, एकत्रित राहत असताना काही दिवसातच एकमेकांशी खटके उडून वाद होत असल्याचे समोर येत आहे. यातूनच खून, खुनाचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे घडू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मागील काही दिवसात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांचा घात झाल्याच्या घटना घडल्या समोर आल्या आहेत. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणा देखील हैराण झाली आहे.

१) खुनानंतर खंबाटकी घाटात फेकला मृतदेह
जयश्री विनय मोरे (२७, रा. मारुंजी) आणि दिनेश ठोंबरे (३२, रा. मावळ) हे मागील पाच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना अडीच वर्षाचा ‘शिव’ नावाचा मुलगा देखील आहे. जयश्री लग्नासाठी तगादा लावत असल्याने २४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास दिनेशची पत्नी पल्लवी आणि जयश्री अडीच वर्षीय मुलासह भुमकर चौकात भेटले. दरम्यान, भर रस्त्यावर जयश्रीने प्रियकर दिनेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी दिनेश याने टोच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली. त्यानंतर मेहुणा आणि पत्नीच्या मदतीने मृतदेह खंडाळा येथील खंबाटकी घाटात टाकून दिला. त्यानंतर अडीच वर्षीय शिव याला आळंदीतील कार्तिकी यात्रेत बेवारस सोडून दिले.

२) विधवा महिलेचा दाबला गळा
रिक्षा चालक विनायक अनिल आवळे (३५, रा. एमएम चौक, काळेवाडी) याची शिवानी सोमनाथ सुपेकर (२८, रा. वडगाव मावळ) या प्रवासी महिलेशी ओळख झाली. शिवानी विधवा असल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, दोनच महिन्यानंतर आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेऊन पळ काढला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी जगतापनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.

३) राशन मागितल्याने पेट्रोल टाकून पेटवले
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियसीने राशन आणि खर्चासाठी पैसे मागितले. याचा राग आल्याने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रियसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. २) रहाटणी येथे घडली. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी आदम खान मलंग खान पठाण (२९, रा.काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली होती.

४) विधवा, घटस्फोटीत महिलांना टार्गेट
लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी विधवा, घटस्फोटीत महिलांना टार्गेट केले जाते. अशा महिलांना कौटुंबिक आधार नसल्याचे पाहून प्रेमाचे जाळे टाकले जाते.काही दिवस एकत्र राहिल्यानंतर संबंधित महिलेपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गुन्हे केले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आर्थिक किंवा संशयावरून वाद
अनेकदा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये कालांतराने आर्थिक बाब किंवा संशयाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये भांडण होऊन परिणाम टोकाला जातो. ‘लिव्ह इन’मध्ये दोघेही कमावते असल्यास त्यांच्यामध्ये अधिकाराची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यांच्यामध्ये अगोदर असलेले प्रेम आणि संवाद कमी होत जाऊन विसंवाद वाढत जातो. दोघेही कमावत असल्याने दोघांमध्ये अधिकाराची भावना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. या कारणाने देखील त्यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचे जाणकार सांगतात.

‘लिव्ह इन’ संकल्पनेसाठी भारतात कायदा नाही आहे. कलम-२१ अंतर्गत जीवन जगण्याचा घटनात्मक हक्क प्रत्येकाला आहे. यातूनच अशा पद्धतीच्या संबंधांना मान्यता दिली गेली आहे. दोन प्रौढ व्यक्ती अशा पद्धतीने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये लग्न न करताही राहू शकतात. ते बेकायदेशीर मानले जात नाही. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा या दोन व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती लग्न झालेली असल्यास या संबंधांमध्ये नक्कीच अडचणी निर्माण होतात. कालांतराने लग्न झालेल्या व्यक्तीचा जोडीदार यावर अधिकार गाजवू शकतो. या कारणाने पुढे अनेक प्रश्न उद्‌भवू शकतात. मग ते आर्थिक मालमत्तेसंबंधात असतील किंवा काही हक्कापोटी असतील. प्रश्न उद्‌भवतात तेव्हा वाद विकोपाला जातात. यातूनच गुन्हे घडतात.

लिव्ह इन मध्ये रराहण्याचे नियम व अटी:
– दोन्ही व्यक्तींच्या वास्तव्याचा कालावधी आवश्यक आहे.
– दोघांनी पती-पत्नी प्रमाणे एका घरामध्ये एकाच छताखाली राहणे बंधनकारक आहे.
– दोघांनी फक्त घरगुती वस्तूचा वापर करावा.
– दोघांनी एकमेकांना घरातील कामात मदत करावी.
– ‘लिव्ह इन’मध्ये राहणारे जोडपे आपल्या मुलाला सोबत ठेवू शकतात.
– ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याने त्यांची माहिती उघड करावी. त्यांच्यात गुप्त संबंध नसावेत.
– ‘लिव्ह इन’मध्ये राहणारे दोघेही प्रौढ असावेत.
– ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या दोघांनी स्वतःहून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असावा.
– सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या दोघांसोबत त्यांचा कोणताही पूर्वीचा जोडीदार नसावा.