लिटील स्टार आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल

0
84

चिंचवड, दि. 16 जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या गुन्ह्यात लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूलचे श्रेयकुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या गुन्ह्यामध्ये ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डीकोस्टा (रा. बंगलोर) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विलास दयाराम पाटील (वय 51, रा. नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 पासून आरोपींनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत

पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत आहेत. त्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत 11 शाळा आहेत. या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.